Ahilyanagar News: अहिल्यानगर- राज्यातील १०८ रुग्णवाहिका वाहन चालक गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहे. त्यांच्या समस्यांबाबत १३ मे २०२५ रोजी आझाद मैदानमध्ये आंदोलन करून निवेदन दिले होते. त्यावेळी १०८ वाहन चालकांच्या मागण्यांबाबत शासनाने व संबंधित कंपनीने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नसून राज्यातील रुग्णवाहिका चालकांचा काम बंद आंदोलन सुरू करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
आंदोलनात अनेकांचा सहभाग
यावेळी १०८ रुग्णवाहिका चालक युनियन संघटनेचे अध्यक्ष अशोक कराळे, उपाध्यक्ष अतुल शिंदे, संजय दरवडे, सतीश शिरसाठ, नितीन चेमटे, शरद अस्वर, संजय ओहोळकर, राहुल वाकचौरे, वाल्मीक शितोळे, संतोष चौधरी, भीमराज मोकाटे, जगन्नाथ खेमनार, आप्पासाहेब झुंबड, किशोर घनवट, सुनील देशमुख, सोमनाथ बांडे आदी उपस्थित होते.

निवदेन देऊनही मागण्यांची पूर्तता नाही
निवेदनात म्हटले की, सेवा पुरवठा कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. चालक संघटनेने कंपनीला निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती. १५ जून पर्यंत चर्चा करून मागण्याचे पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला होता. परंतु १०८ वाहनचालकांच्या मागण्यांबाबत कुठली हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
कोविड भत्ता मिळालेला नाही
चालकांना समान काम समान वेतन दिले पाहिजे व पीएफ २०१४ ते २०१७ पर्यंत कापलेल्या नसून तो मिळावा तसेच कोविड काळामध्ये रुग्णवाहिका चालकांनी जीवावर उदार होऊन काम केले आहे. मात्र, त्यांना कोविड भत्ता शासनाने कंपनीला देऊन देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेला नसून तो देण्यात यावा व रुग्णवाहिका चालक याला कोणताही सुरक्षा कवच विमा नसून विमा करण्यात यावा या विविध मागण्या आहेत. या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.