Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या कार्यवाहीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी ६०८ विद्यार्थ्यांनी संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्रे जमा करून आपले प्रवेश निश्चित केले. सोमवारी २३५० आणि मंगळवारचे ६०८ असे एकूण २९५८ विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश घेतला आहे.
५२ हजार २३२ विद्यार्थ्यी नोंदणी
जिल्ह्यात ४५४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली. जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण झालेले ६१ हजार ४१२ विद्यार्थी असून यातील अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी ५२ हजार २३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यात विविध तुकड्यांची प्रवेश क्षमता ८० हजार आहे. नियमित फेरी एकमधील कॅप व कोटा अंतर्गत प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरू झाली.

९ जुलैनंतर दुसरी यादी
सोमवारी विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर झाली असून १ ते ७ जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर ९ जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. दोन दिवसांत २९५८ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी अकरावीत प्रवेश निश्चित केला आहे.
८० हजार विद्यार्थी प्रवेश क्षमता
जिल्ह्यातील उच्च माध्यमिक विद्यालयात विविध शाखांच्या १०५७ तुकड्या मंजूर आहेत. यामध्ये कला शाखेच्या ३७४ तुकड्या, वाणिज्य शाखेच्या १६१, विज्ञान शाखेच्या ४८४, संयुक्त २९, व्होकेशनल शाखेच्या ९ अशा एकूण १०५७ तुकड्या जिल्ह्यात मंजूर आहेत. या शाखांत सुमारे ८० हजार विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे.