आपण ज्या पृथ्वीवर उभं राहून आपलं दैनंदिन आयुष्य जगतो, ती पृथ्वी प्रत्यक्षात एका विलक्षण वेगाने फिरतेय तब्बल ताशी 1,670 किलोमीटर. आता कल्पना करा, तुम्ही एवढ्या वेगाने फिरणाऱ्या वस्तूवर उभं आहात, चालत आहात, खेळत आहात, झोपत आहात आणि तरीही तुम्हाला काहीच जाणवत नाही. न हलणं, न झटका बसणं, न कसली थरथर. हे इतकं आश्चर्यकारक आणि अद्भुत आहे की, अनेकांच्या मनात हा प्रश्न उद्भवतो आपण पृथ्वीच्या गतीमुळे खाली का पडत नाही?

गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वी
हे समजून घ्यायचं असेल तर, आपल्याला एक साधी तुलना उपयोगी पडेल. जसं आपण एखाद्या वेगात असलेल्या ट्रेनमध्ये आरामात बसून प्रवास करतो, आणि ट्रेन अचानक थांबत नाही तोपर्यंत आपल्याला काही विशेष जाणवत नाही, अगदी तसंच पृथ्वीच्या फिरण्याबाबतही घडतं. आपण पृथ्वीच्या गतीचा एक भाग झालो आहोत. पृथ्वी ज्या गतीने फिरते, त्याच गतीने आपले शरीरभाग फिरत असतात. म्हणूनच बाहेरून काही वेगळं वाटत नाही. एखाद्या ट्रॉलीमध्ये ठेवलेली वस्तू जशी तिच्यासोबतच चालते, तशीच आपली स्थिती आहे.
गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी आपल्याला आपल्याच दिशेने खेचत असते. हे गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वीची एक नैसर्गिक शक्ती आहे, जी आपल्या सगळ्यांना तिच्या पृष्ठभागाकडे खेचत ठेवते. आपण कितीही उडण्याचा प्रयत्न केला तरी, काही क्षणांनी परत जमिनीवर येतोच ते गुरुत्वाकर्षणामुळे. पृथ्वीचा वेग कितीही असो, ही शक्ती आपल्याला पृथ्वीवर स्थिर ठेवते.
आर्यभट्ट यांचा सिद्धांत
याशिवाय, पृथ्वी केवळ स्वतःभोवतीच नाही, तर सूर्याभोवतीही फिरते. या दोन्ही हालचाली शतकानुशतकं शास्त्रज्ञांनी अभ्यासून सिद्ध केल्या आहेत. खरंतर हे ज्ञान आपल्या प्राचीन भारतीय विद्वानांकडून सुरू झालं होतं. खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी 5 व्या शतकातच पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरते हे सांगितलं होतं. मात्र त्या काळात याला सिद्ध करणं कठीण होतं. यानंतर, 16 व्या शतकात युरोपातील निकोलस कोपर्निकस यांनी ‘सूर्यकेंद्रित’ सिद्धांत मांडला, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवतीही फिरते. नंतर गॅलिलिओ आणि न्यूटन यांनीही या सिद्धांतांना वैज्ञानिक आधार दिला.
आपल्याला पृथ्वीच्या फिरण्याचा थरार जाणवत नाही, कारण आपण त्या फिरण्याचाच एक भाग आहोत. जसं एखाद्या खेळात आपण गुंतून जातो आणि वेळ कसा जातो कळत नाही, तसंच पृथ्वीच्या या अविरत फिरण्याचंही आपल्याला भान राहत नाही.