एखादं थंडगार कोल्ड्रिंक प्यायल्यावर जी झणझणीत थंडी मनाला ताजं करत जाते, ती क्षणिक मजा खरोखर आपल्या शरीरासाठी किती मोठं नुकसान करून सोडते, हे फारसं कुणाला माहित नसतं. अनेक घरांमध्ये ही पेये मुलांना ‘सॉफ्ट ड्रिंक’ म्हणून दिली जातात, वृद्धांनाही ते रुचतात आणि प्रौढ वर्गासाठी तर हे जवळजवळ दैनंदिन सवयीचं झालंय. पण हेच पेय, जे दिसायला निरुपद्रवी वाटतं, ते अल्कोहोलपेक्षा जास्त घातक असते.

आपल्याला अल्कोहोलचे दुष्परिणाम मोठ्या आवाजात सांगितले जातात. त्याच्या व्यसनाधीनतेपासून यकृत निकामी होईपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला माहिती असतात. पण सॉफ्ट ड्रिंक? हे तर टीव्हीवर जाहिरातींमध्ये उघडपणे दाखवलं जातं. त्यामुळेच बहुतेकांना वाटतं की हे काही वाईट नाही. पण यामध्ये लपलेला धोका हा फारच खोल आहे.
‘सॉफ्ट ड्रिंक’चे परिणाम
प्रत्येक बाटलीत दडलेली प्रचंड साखर ही एक गंभीर बाब आहे. ही साखर फक्त चव वाढवत नाही, तर शरीरात चरबी जमा करून लठ्ठपणाला आमंत्रण देते. त्याचबरोबर, रक्तातील साखरेची पातळीही अनियंत्रित होते आणि मधुमेहासारख्या आजारांना वाट मोकळी होते. ही एक अशी साखर असते, जी आपल्या शरीरात झपाट्याने कार्य करते, पण दीर्घकाळासाठी परिणाम सोडून जाते.
यापेक्षाही अधिक गंभीर गोष्ट म्हणजे यकृतावर होणारा परिणाम. रोज एक-दोन कोल्ड्रिंक पिण्याची सवय लागली, की यकृत हळूहळू चरबीयुक्त होऊ लागतो. फॅटी लिव्हर ही सुरुवात असते, पण ही वेळेवर थांबवली नाही तर लिव्हर सिरॉसिस किंवा इतर गंभीर विकारांपर्यंत गोष्टी पोहोचतात.
तरुण मुलांसाठी अत्यंत धोकादायक
सॉफ्ट ड्रिंकमधील फॉस्फोरिक अॅसिड देखील एक अदृश्य शत्रू आहे. हे आपल्या हाडांमधून कॅल्शियम खेचून घेतं, आणि कालांतराने हाडं कमकुवत बनतात. विशेषतः मुलांमध्ये हे खूप धोकादायक आहे. वाढीच्या वयात हाडं बळकट होणं अत्यावश्यक असतं, पण जर सतत कोल्ड्रिंक्स प्यायल्या गेल्या, तर हाडं अकाली झिजू लागतात.
या सर्व बाबींकडे आपण डोळे झाकतो. कारण हे पेय ‘नॉर्मल’ मानलं जातं. कोणत्याही वयाचा माणूस ते पिताना चुकीचं काही करत आहे, असं कुणाला वाटतच नाही. पण हेच पेय दीर्घकाळासाठी आरोग्याचा शत्रू ठरू शकतो. त्यामुळे सॉफ्ट ड्रिंकचे सेवन अतिजास्त करू नये.