जगभरातील देश आज जेव्हा त्यांच्या संरक्षण क्षमतेला अधिकाधिक सक्षम बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत, तेव्हा युद्धभूमीवर निर्णायक ठरणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होताना दिसते. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे ही केवळ तंत्रज्ञानाची कमाल नसून, ती त्या देशाच्या सामरिक ताकदीचे आणि जागतिक पातळीवरील स्थानाचेही प्रतीक असते. या संदर्भात काही देशांनी अशा क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे, जी हजारो किलोमीटरवर अचूक मारा करू शकतात आणि विशेष म्हणजे, भारताचे अग्नि-V या यादीत ठामपणे आपले स्थान निर्माण करत आहे.

रशियाचे RS-28 क्षेपणास्त्र
जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या यादीत अग्रस्थानी सध्या रशियाचे RS-28 सरमत हे क्षेपणास्त्र आहे, ज्याची क्षमता तब्बल 18,000 किलोमीटरवर मारा करण्याची आहे. हे ‘डूम्सडे वेपन’ म्हणूनही ओळखले जाते, आणि हे संपूर्ण खंड नष्ट करू शकते, अशी शक्यता अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याच रशियाचे जुने पण अत्यंत प्रभावी R-36M क्षेपणास्त्र देखील आजही चर्चा झोतात आहे. ‘सैतान’ या नावाने प्रसिद्ध असलेले हे क्षेपणास्त्र 10,000 किलोमीटरहून अधिक अंतर पार करू शकते.
डोंगफेंग-41 (चीन)
चीन देखील या शस्त्रस्पर्धेत मागे नाही. त्यांचं डोंगफेंग-41 (DF-41) हे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल 12,000 किलोमीटरच्या आसपासची रेंज गाठते. चीनच्या सत्ताकेंद्रातून थेट अमेरिकेपर्यंत मारा करण्याची या मिसाईलची क्षमता आहे.
ह्वासॉन्ग-17 (उ. कोरिया)
उत्तर कोरियाने देखील जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे त्यांच्या ह्वासॉन्ग-17 या महाकाय क्षेपणास्त्रामुळे. या मिसाईलची रचना आणि त्याचे 22 चाकी वाहन, हेच दाखवून देतं की हा एक भस्मासुरासारखा शस्त्रप्रकार आहे. त्याची अचूक रेंज जरी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नसली, तरी तज्ञांचं म्हणणं आहे की ती सुद्धा 15,000 किलोमीटरच्या आसपास जाऊ शकते.
LGM-30 मिनिटमॅन III
अमेरिकेकडेही अशा सामर्थ्यवान मिसाईल्स आहेत. LGM-30 मिनिटमॅन III हे क्षेपणास्त्र त्यांच्या आण्विक डिटरन्स स्ट्रॅटेजीचा एक महत्त्वाचा भाग आहे. वर्षानुवर्षे हे मिसाईल अमेरिकी संरक्षण यंत्रणेचा विश्वासू भाग राहिलं आहे.
भारताची अग्नि-V मिसाईल
या सगळ्यांमध्ये भारताची अग्नि-V मिसाईल ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब ठरते. सुमारे 5,000 किलोमीटरहून अधिक रेंज असलेलं हे क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षणाच्या तयारीचा मोठा आधारस्तंभ मानलं जातं. केवळ अण्वस्त्र वाहून नेण्याचीच नाही, तर 7,500 किलो वजनाचा बंकर-बस्टर वॉरहेड घेऊन जाण्याची क्षमता यामध्ये आहे, जे युद्धाच्या संभाव्य टप्प्यावर निर्णायक ठरू शकते.