कोविड महामारीनंतरच्या काळात एक प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसला आहे. अचानक होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांचे आणि कोविड लसीकरणाचे काही संबंध आहे का? समाज माध्यमांवरून पसरत गेलेल्या अनेक अफवा आणि अपुऱ्या माहितींमुळे ही शंका सामान्य लोकांच्या मनात खोलवर रूजली आहे. मात्र, आता या प्रश्नावर भारताच्या दोन आघाडीच्या वैद्यकीय संस्थांनी एक सुस्पष्ट आणि वैज्ञानिक उत्तर दिलं आहे.

ICMR-AIIMS चा निष्कर्ष
ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) आणि AIIMS (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) यांनी यावर विस्तृत संशोधन केलं असून, त्यांच्या अभ्यासातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. कोविड लसीकरण आणि हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या अचानक मृत्यूमध्ये कोणताही थेट संबंध आढळून आलेला नाही. आरोग्य मंत्रालयाने देखील या निष्कर्षावर शिक्कामोर्तब करत स्पष्ट केलं आहे की भारतात वापरल्या गेलेल्या कोविड लसी सुरक्षित आहेत आणि त्यांचे गंभीर दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत.
ही माहिती फक्त वैज्ञानिक नाही, तर समाजाला दिलासा देणारी आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला अनेक अशा बातम्या ऐकायला मिळाल्या ज्या हृदयविकाराने अचानक मृत्युमुखी पडलेल्या तरुणांबाबत होत्या. यामुळे अनेकांना लसीकरणावर संशय वाटू लागला होता.
हार्ट अटॅकचे प्रमाण वाढण्यामागील कारणे
मात्र तज्ञ सांगतात की या मृत्यूमागे आनुवंशिकता, आधीपासून असलेले आजार, तणावपूर्ण जीवनशैली, झोपेचा अभाव आणि कोविडमुळे शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंती यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात.
कोविड लसीकरणाला दोषी ठरवण्याची प्रवृत्ती ही केवळ अपूर्ण माहितीच्या आधारावर बनलेली अफवा आहे, असं वैज्ञानिक आणि वैद्यकीय तज्ज्ञ ठामपणे सांगत आहेत. लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती निर्माण होते, गंभीर संसर्गाची शक्यता कमी होते आणि मृत्यूचे प्रमाणही घटते हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील संशोधनांनी अधोरेखित केले आहे.