आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी असा अनुभव आलेला असतो, डोकं अगदी भरलेलं वाटतं, विचार करता येत नाही, लक्ष केंद्रित होत नाही आणि लहानसहान गोष्टीदेखील विसरायला होतात. हा अनुभव अगदी क्षणिकही असू शकतो किंवा काही आठवडे-महिन्यांपर्यंतही टिकू शकतो. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो, पण ही अवस्था म्हणजेच ‘ब्रेन फॉग’ असू शकते आणि त्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे.
‘ब्रेन फॉग’ म्हणजे काय?

‘ब्रेन फॉग’ हा शब्द वाचला की आपल्याला लगेच लक्षात येतं, मेंदूमध्ये जणू धुकं पसरलेलं आहे. आपण विचार करतोय, पण तो विचार धुसर आहे. निर्णय घ्यायचा असतो, पण मन गोंधळलेलं असतं. याला आजार म्हणत नाहीत, पण ही अवस्था तुमचं मानसिक आरोग्य, काम करण्याची क्षमता आणि अगदी दैनंदिन जीवनावरही खोलवर परिणाम करू शकते. या गोंधळलेल्या मनःस्थितीमुळे आयुष्याची गतीच थांबून जाते, आणि व्यक्तीला आपणच स्वतःपासून दूर जात आहोत असं वाटायला लागतं.
विशेष म्हणजे, कोविड-19 नंतर अशा लक्षणांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. ‘लॅन्सेट न्यूरोलॉजी’ या मान्यताप्राप्त वैद्यकीय जर्नलमध्ये नमूद केलं गेलं आहे की कोविडमधून बरे झालेल्या जवळपास 30% लोकांमध्ये ब्रेन फॉगची लक्षणं आढळली आहेत. काही रुग्णांना आठवडेभर हा त्रास जाणवतो, तर काहींना महिन्याभरासाठी. यामुळे केवळ त्यांच्या कामकाजावरच नव्हे तर संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम होतो.
‘ब्रेन फॉग’ची लक्षणे
या अवस्थेची लक्षणं ओळखणं महत्त्वाचं ठरतं. सुरुवातीला ती लहानशी विस्मृती वाटते. घराची चावी कुठे ठेवली, कुणाला कॉल करायचा होता, हे लक्षात राहात नाही. त्यानंतर चिडचिड वाढते, झोपेचं प्रमाण कमी होतं आणि दिवसभर थकवा जाणवत राहतो. काही वेळा निर्णय घेण्याची क्षमताही कमकुवत होते आणि एखादी गोष्ट मन लावून करणं अशक्य वाटतं.
या सर्व गोंधळामागे अनेक कारणं असू शकतात. सततचा ताण, झोपेचा अभाव, शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता, हार्मोनल बदल हे सगळे घटक मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. विशेषतः महिलांना गर्भावस्थेत, रजोनिवृत्तीनंतर किंवा थायरॉईडच्या असंतुलनामुळे हे लक्षणं जास्त प्रमाणात जाणवतात. शरीरात व्हिटॅमिन B12, D, आयर्न किंवा ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सची कमतरता असेल, तर मेंदूच्या पेशी दुर्बल होतात आणि याचा थेट परिणाम लक्ष, स्मरणशक्ती आणि भावनांवर होतो.
जाणून घ्या उपाय
पण चांगली बातमी अशी आहे की ब्रेन फॉगमधून पूर्णपणे बाहेर पडता येऊ शकतं, तेही कोणत्याही औषधांशिवाय. सर्वात आधी शरीराला आणि मेंदूला विश्रांती देणं महत्त्वाचं आहे. रोजच्या झोपेचा वेळ कमीत कमी 7 ते 8 तासांचा असावा. नियमित व्यायाम, पौष्टिक आहार, ध्यान, योग आणि डिजिटल वापर कमी करणे यामुळे मेंदूचं स्वास्थ्य टिकवणं शक्य होतं. विशेषत: कोविडमधून बरे झालेल्यांसाठी डॉक्टर लस घेणं, योग्य खबरदारी घेणं आणि आयुष्यात सकारात्मक बदल करणं या गोष्टींचा सल्ला देतात.