पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकांची धडाकेबाज कामगिरी, अहिल्यानगर शहरातील मावा बनवणारे कारखाने केले उद्धवस्त

Published on -

अहिल्यानगर : सावेडी उपनगरातील संदेशनगरमधील सुगंधित तंबाखू व मावा तयार करण्याचा कारखाना बुधवारी (दि. २) पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी छापा घालून उद्ध्वस्त केला. सुमारे २ लाख २९ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार जणांना ताब्यात घेतले.

गोरक्षनाथ शंकर मुर्तडकर (वय ४८ रा. नवनाथ निवास, संदेशनगर, नामदेव चौक ता. जि. अहिल्यानगर), शुभम रावसाहेब गुंजाळ (वय २१ हल्ली रा. सहकार नगर, पाईपलाईन रोड मूळ रा. वांबोरी ता. राहुरी), गणेश बापू डोईफोडे (वय २९ रा. वडगाव गुप्ता ता. जि. अहिल्यानगर), विक्री राजू खैरे (वय ४० रा. जाधव मळा, तुलसी पार्क, ता. जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचे पथक बुधवारी शहरात पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना संदेश नगर, नामदेव चौक येथे गोरक्षनाथ मुर्तडकर हा घराच्या छतावर सुगंधीत तंबाखुपणासून मावा तयार करीत आहे. तिथे मावा तयार करण्यासाठी मोठ्या मशिनही आहेत, अशी माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिस उपअधीक्षक खाडे यांनी तत्काळ तोफखाना पोलिस ठाण्याचे पथकास बरोबर घेत संदेश नगरमधील नवनाथ नावाच्या बंगल्यावर छापा घातला. त्या ठिकाणी वरील चार जण सुगंधी तंबाखू त्यामध्ये सुपारी टाकून इलेक्ट्रीक मशिनवर मावा तयार करताना मिळून आले. त्या चौघांना ताब्यात घेतले असता त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली. त्यांच्या ताब्यातून एक लाखाच्या मावा तयार करणाऱ्या दोन मशीन, तीन हजारांचा वजनकाटा, १० हजार ७०० रुपयांचे मावा तयार करण्याचे साहित्य, एक लाख १६ हजार २१० रुपयांची २३६.५ किलो सुगंधी तंबाखू व तयार मावा असा एकूण दोन लाख २९ हजार ह९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई विशेष पथकाचे उपअधीक्षक संतोष खाडे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहायक फौजदार शकील शेख, पोलिस अंमलदार शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखिले, मल्लीकार्जुन बनकर, दिनेश मोरे, अरविंद भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनील पवार, सुनिल दिघे, अमोल कांबळे, जालिंदर दहिफळे, दीपक जाधव, विजय ढाकणे यांच्या पथकाने केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!