जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनच्या नावाबाबत सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. राजधानीच्या हृदयस्थानी असलेल्या या ऐतिहासिक स्टेशनचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, आणि यामागचे प्रस्तावित नाव आहे’महाराजा अग्रसेन रेल्वे स्टेशन.’ ही मागणी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एका अधिकृत पत्राच्या माध्यमातून केली आहे.
गुप्ता यांच्या मते, महाराजा अग्रसेन हे ना फक्त अग्रवाल समाजाचे प्रेरणास्थान आहेत, तर एक आदर्श, धर्मशील आणि समाजहितैषी राजा म्हणून भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर हे स्टेशन नामांकित केल्यास दिल्लीतील व्यापारी वर्गाचा सन्मान होईल आणि एक ऐतिहासिक ओळख नव्याने उजळेल.

जुनी दिल्ली रेल्वे स्टेशन
राजकीय स्तरावर मात्र या प्रस्तावाला मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. विरोधक याकडे निवडणुकीपूर्वीचे टार्गेटेड राजकारण मानत आहेत. विशेष म्हणजे, जुनी दिल्ली परिसरात अग्रवाल, मारवाडी आणि इतर व्यापारी समुदाय गेल्या अनेक दशकांपासून स्थायिक आहेत. या समाजाचे सखोल योगदान दिल्लीच्या व्यापारजगताला घडवण्यात राहिले आहे. त्यामुळे या प्रस्तावाला राजकीय पेक्षा भावनिक आणि सामाजिक महत्त्व अधिक आहे, असेही अनेकांचे मत आहे.
कोण होते महाराजा अग्रसेन?
महाराजा अग्रसेन यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर ते केवळ एका समाजाचे प्रणेते नव्हते, तर त्यांनी भारतात न्याय, समानता आणि व्यापारधर्म या मूल्यांची जी पायाभरणी केली, ती आजच्या काळातही अनुकरणीय ठरते. ते सूर्यवंशीय क्षत्रिय होते, आणि रामचंद्राच्या वंशातील कुशाचे वंशज मानले जातात. त्यांनी हरियाणातील अग्रोहा येथे आपल्या राज्याची स्थापना केली होती, जे ठिकाण आजही एक धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.
महाराजांच्या काळातील व्यवस्थेत कोणताही भेदभाव नव्हता. कोणत्याही धर्म, जात किंवा वर्गातील व्यक्तीला समान हक्क, समान न्याय आणि व्यापाराची संधी मिळत असे. अग्रसेन महाराजांनी व्यापाराला एक प्रतिष्ठेचे स्थान दिले आणि आपल्या लोकांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. म्हणूनच अग्रवाल समाज आजही उद्योग, व्यापार, शिक्षण आणि समाजसेवेच्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे.
देशभरात अग्रसेन महाराजांच्या नावाने शाळा, महाविद्यालये, धर्मशाळा, रुग्णालये उभारण्यात आली आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करणारे हजारो पुतळे उभे आहेत. प्रत्येक वर्षी त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. त्यामुळे, त्यांच्या नावाने रेल्वे स्टेशनचे नामकरण झाले तर ती केवळ एक औपचारिकता नसेल, तर एका विचारधारेला, एका मूल्यप्रणालीला मिळणारा सन्मान असेल. मात्र, या नामांतरवरून सध्या दिल्लीचे राजकारण चांगलेच तापले आहे.