कधीकाळी केवळ वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखले जाणारे युएई आज जागतिक श्रीमंतांचे आवडते स्थळ बनले आहे. बुर्ज खलिफाच्या शिखरापर्यंत पोहोचणारा दुबईचा आत्मविश्वास, भव्य पाम जुमेराह आणि चकाचक रस्त्यांवरून धावणारी लक्झरी कार्स ही आजच्या युएईची ओळख बनली आहे. मात्र आता ही श्रीमंती केवळ दर्शनी राहिलेली नाही, ती स्थलांतराच्या आकड्यांमध्येही स्पष्टपणे दिसते आहे. 2025 पर्यंत जवळपास 9,800 करोडपती युएईमध्ये स्थायिक होतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय, आणि त्यामध्ये भारतासारख्या देशातून मोठ्या प्रमाणावर लोकांचा ओघ सुरु झालाय.
युएईमधील सुविधा

युएईत इतक्या मोठ्या प्रमाणावर श्रीमंत का येत आहेत, यामागे एकमेव कारण आहे त्यांचे शून्य कर धोरण. कोणताही वैयक्तिक उत्पन्न कर नाही, भांडवली नफा नाही आणि ना वारसा कर. म्हणजे, आपल्या कष्टाने कमावलेले सर्व पैसे व्यक्तीच्या हक्काचे. अशा व्यवस्थेत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढतो आणि संपत्ती सुरक्षित असल्याचा अनुभव मिळतो. त्यात भर म्हणजे युएई सरकारने सुरू केलेली ‘गोल्डन व्हिसा’ योजना, ज्याअंतर्गत 5 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्यास थेट 10 वर्षांचा निवासी व्हिसा मिळतो. स्थायिक होण्याचा, गुंतवणुकीचा आणि कुटुंबासोबत स्थैर्याने जगण्याचा मार्ग खुला होतो.
दुबई आणि अबूधाबीमधील रहिवासी सुविधा ही आणखी एक कारण आहे. जगातील सर्वोत्तम आरोग्य सेवा, आंतरराष्ट्रीय शाळा, सुरक्षिततेचा उच्च दर्जा आणि कायदेशीर स्पष्टता ही श्रीमंत कुटुंबांच्या मनात विश्वास निर्माण करणारी ठोस कारणं आहेत. दुबईतील DIFC आणि अबूधाबीतील ADGM ही वित्तीय केंद्रे गुंतवणुकीच्या दृष्टीने विश्वासार्ह आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. त्यामुळे फक्त पर्यटन किंवा कामासाठी नव्हे, तर पूर्ण वेळ राहत जगण्याचा निर्णयही अनेकांनी घेतला आहे.
गुन्हेगारीचा दरही अत्यंत कमी असलेल्या या देशात राजकीय स्थैर्य आहे, जे जागतिक पातळीवर अशा देशांची संख्या कमी आहे. त्यामुळे जगभरातील श्रीमंत लोकांना हे ठिकाण एक सुरक्षित निवासस्थळ वाटते. युएईचे भौगोलिक स्थानही फार महत्त्वाचे आहे. युरोप, आशिया आणि आफ्रिकेच्या मध्ये असलेल्या या देशात जगभरातून सहज प्रवास करता येतो.
भारतातील गुंतवणूकदारांचा वाटा
भारतातील श्रीमंत वर्गही या संधीचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे. दुबईतील प्रॉपर्टी मार्केटमध्ये सध्या भारतीय गुंतवणूकदारांचा वाटा जवळपास 40% आहे. दिल्ली-NCR, अहमदाबाद, हैदराबाद आणि पंजाबमधून येणारे अनेक गुंतवणूकदार इथे मालमत्ता विकत घेत आहेत. त्यांच्या दृष्टीने हे केवळ आर्थिक निर्णय नाहीत तर जीवनशैली, सुरक्षितता आणि भविष्यातील स्थिरतेसाठीचा एक योजनेचा भाग आहे.
भविष्यात युएईने 1.2 ट्रिलियन डॉलर्सच्या संपत्तीचं व्यवस्थापन करण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे. युएई आता फक्त तेलावर जगणारा देश राहिलेला नाही, तर जागतिक आर्थिक नकाशावर आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा ‘संपत्तीचा केंद्रबिंदू’ बनतो आहे.