शालेय किंवा कॉलेज जीवनातही आता स्मार्टफोन्स आवश्यक झाले आहेत. कारण, प्रत्येक अपडेट आता मोबाइलवरच दिली जाते. कॉलेज-शाळा यांचे व्हाट्सअप ग्रुप असतात किंवा काही विशेष ऑनलाइन लेक्चर्स दिले जातात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे आजकाल फोन दिसून येतातच. सध्या विद्यार्थ्यांसाठी काही शैक्षणिक अॅप आले आहेत, जे वैयक्तिक शिक्षक, नियोजक आणि समुपदेशकही बनू शकतात. हल्लीच्या डिजिटल युगात शिकणं आणि स्वतःला घडवणं हे केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तुम्ही जर एक विद्यार्थी असाल किंवा तुमचं मूल घरी अभ्यास करत असेल, तर काही अॅप्स अशा प्रकारे मदत करतात की तुमचं शिकणं अधिक सोपं, प्रभावी आणि रचनात्मक होतं.
‘Focus To-Do’ अॅप

अभ्यासाची सुरुवात होते लक्ष केंद्रित करण्यापासून. आणि तेच सगळ्यात कठीण ठरतं, विशेषतः जेव्हा फोनवर सतत नोटिफिकेशनचा भडिमार सुरू असतो. अशा वेळी ‘Forest’ किंवा ‘Focus To-Do’ ही अॅप्स एक वेगळाच अनुभव देतात. फॉरेस्टमध्ये जसं एक झाड लावता, ते फक्त तुम्ही फोनपासून दूर राहिलात तरच वाढतं हे एक मजेदार, पण मनाला शिस्त लावणारं साधन ठरतं. तर फोकस टू-डू ‘पोमोडोरो’ नावाच्या अभ्यास पद्धतीवर आधारित असून वेळा ठरवून, विश्रांतीसह, शिकण्याची सवय लावतो.
‘Google Calendar’
शिक्षणात वेळ व्यवस्थापन हा दुसरा मोठा मुद्दा. अभ्यास, परीक्षा, असाइनमेंट्स आणि क्वचित वेळ मिळणाऱ्या भेटीगाठी यांचं योग्य नियोजन करायचं असेल, तर ‘Google Calendar’ आणि ‘TimeTune’ सारखी अॅप्स उपयोगी पडतात. तुम्ही आपल्या वेळापत्रकात कोणतीही गोष्ट लक्षात ठेवायचं विसरत असाल, तरी हे अॅप्स तुमच्या जागी ते लक्षात ठेवतील. वर्ग वेळा, सबमिशन डेडलाइन, छोट्या नोट्स सगळं एका ठिकाणी आणि सोप्या भाषेत व्यवस्थित मांडता येतं.
‘Google Keep’ आणि ‘Notion’
अभ्यास करताना आपल्या सर्व नोट्स आणि विचार एकत्र ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ‘Google Keep’ आणि ‘Notion’ या दोन्ही अॅप्स तुमचं हे काम फार सहजरीत्या करतात. कुठेही एखादी कल्पना सुचली की लगेच त्यात नोंद करू शकता. यामध्ये टास्क लिस्ट, प्रोजेक्ट्सची माहिती, किंवा वर्गातील नोट्स सगळं अगदी स्पष्ट आणि आकर्षक पद्धतीने साठवता येतं.
‘Microsoft Lens’ किंवा ‘Adobe Scan’
दस्तऐवजांचं स्कॅनिंग ही विद्यार्थ्यांची अजून एक गरज. ‘Microsoft Lens’ किंवा ‘Adobe Scan’ यांसारख्या अॅप्समुळे कुठल्याही नोट्स, पुस्तकांतील पानं, हँडआउट्स याचं स्कॅनिंग अतिशय सोपं झालंय. यातून मिळणारी PDF फाईल तुम्ही जपून ठेवू शकता, शेयर करू शकता, आणि ओसीआर टेक्नोलॉजीमुळे त्यातले शब्द कॉपी करायला देखील मिळतात, ज्याचा उपयोग प्रोजेक्ट्समध्ये खूप होतो.
‘Google Drive’
या सगळ्याशी संबंधित फाईल्स, नोट्स, प्रेझेंटेशनस आणि असाइनमेंट्स कुठे सुरक्षित ठेवायच्या याचं उत्तर आहे ‘Google Drive’ किंवा ‘Dropbox’. क्लाउड स्टोरेजमुळे कुठल्याही वेळी, कुठल्याही डिव्हाइसवरून तुमचं काम मिळू शकतं. त्यामुळे हार्डडिस्क हरवली किंवा फोन बंद पडला तरी टेन्शन नाही.
‘Khan Academy’
शेवटी येतो आत्मविकास आणि समजून घेण्याचं महत्त्व. ‘Khan Academy’ हे असं एक मोफत शैक्षणिक व्यासपीठ आहे, जिथे प्राथमिक ते अगदी उच्च शिक्षणापर्यंतचे विषय विडिओ स्वरूपात समजावून सांगितले जातात. याचबरोबर YouTube वर अनेक उपयुक्त चॅनेल्स आहेत Physics Wallah, StudyIQ, Unacademy जे फक्त अभ्यासासाठी नव्हे, तर एकूणच आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात.