अहिल्यानगरमधील दिंडीतील वारकऱ्यांना चारचाकी वाहनाने दिली जोरदार धडक, पाच वारकरी गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक

Updated on -

राहुरी- तालुक्यातील टाकळीमियाँ येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या रथाला पंढरपूरजवळील भोसे गावाजवळ गुरुवारी ३ जुलै रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास एका अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पाच वारकरी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाकळीमियाँ येथून पंढरपूरकडे जाणारी श्री दत्त सेवा पायी दिंडी आपल्या रथासह प्रवास करत असताना भोसे गावाजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातात सुभाष चौधरी, दिलीप आढगळे, सुरेश पाचारणे, भाऊराव शेजूळ आणि देवराम निकम हे पाच वारकरी जखमी झाले आहेत. त्यापैकी सुभाष चौधरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. त्यांनी शासन आणि लोकप्रतिनिधींनी अपघातग्रस्त वारकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे. तसेच दानशूर व्यक्तींनी आणि सामाजिक संस्थांनी या वारकऱ्यांच्या उपचारासाठी पुढाकार घेऊन आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!