भंडारदरा- भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले असून, पाण्याची येणारी आवक पाहून धरणातून पाण्याचा प्रवाह कमी अथवा जास्त करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती धरण शाखेकडून देण्यात आली आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले काही दिवस जोरदार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे धरणाचा साठा सातत्याने वाढत असून तो सात टीएमसीच्या पुढे गेला आहे. सध्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा साठ टक्क्यांहून अधिक म्हणजे झाला आहे. विशेष म्हणजे, जुलै महिन्याच्या तिसऱ्या तारखेलाच धरणात विक्रमी ७ हजार ३५६ दलघनफूट पाणी साठले आहे.

यावर्षी धरणात आधीपासून २५ टक्के पाणी शिल्लक होते, त्यात ४० टक्के नव्या पाण्याची भर पडल्याने एकूण साठा थेट साडेसाठ टक्क्यांवर पोहोचला आहे.
संपूर्ण पावसाळा अजून बाकी आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी धरणाच्या सांडव्यामधून १ हजार ८ क्युसेस वीज केंद्रातून व आठशे पंचेचाळीस क्युसेस मुख्य सांडव्यामधून, असा एकूण १ हजार ९०३ क्युसेस पाण्याचा प्रवाह प्रवरा नदीत सोडण्यात
आला आहे. पावसाच्या प्रमाणावर आणि धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार पाण्याच्या विसर्गात वाढ किंवा घट करण्यात येईल, अशी माहिती धरणाचे शाखाधिकारी प्रवीण भांगरे यांनी दिली आहे.
धरणाच्या वीज निर्मिती केंद्र व सांडव्यामधून पाणी सोडले असले तरी अम्ब्रेला धबधब्यामधून पाणी न सोडल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. भंडारदरा पर्यटनाची ओळखच अम्ब्रेला धबधब्याशी निगडित असल्याने, धबधब्यामधून पाणी सोडावे, अशी मागणी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे. यासंदर्भात संपर्क साधला असता, शाखाधिकारी प्रवीण भांगरे यांनी धरण शाखेमध्ये सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याने अम्ब्रेला धबधब्यातून पाणी सोडण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले.
गत २४ तासांत भंडारदरा परिसरात ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटघर येथे १२७, रतनवाडी येथे ११९, पांजरे येथे ६३ तर वाकी येथे ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता भंडारदरा धरणाचा साठा ७ हजार ३५६ दलघनफूट इतका असून, धरण ६० टक्के भरले आहे. निळवंडे धरणातही पाणीसाठा वाढत असून, ते सध्या ५४.३१ टक्के भरले आहे. या धरणात सध्या ४ हजार ५२३ दलघनफूट पाणीसाठा झाला आहे.