संगमनेर तालुक्यातील भोजापूर धरण यंदा जून महिन्यातच १०० टक्के भरलं, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

Updated on -

संगमनेर तालुक्यातील अवर्षणप्रवण निमोण भागाला वरदान ठरलेले म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बुधवारी (दि. २) सायंकाळच्या सुमारास पूर्ण क्षमतेने १०० टक्के तुडूंब भरले आहे.

भोजापूर धरण यंदा जून महिन्यातच ओव्हरफ्लो झाले असून धरणाच्या सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने म्हाळुंगी नदी प्रवाहित झाली आहे. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

सिन्नर तालुक्यातील भोजापूर पट्ट्यातील म्हाळुंगी नदीवर असलेल्या भोजापूर धरणाची एकूण साठवण क्षमता ४८३ दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा ३६१ दशलक्ष घनफूट इतका असतो. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भोजापूर धरणात पाण्याची मोठी आवक झाली. या धरणाच्या पाण्यावरच सिन्नर व संगमनेर भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे.

त्यामुळे भोजापूर धरण भरण्याची सर्वांना अपेक्षा होती. पश्चिम पट्ट्यात विश्रामगड परिसरात म्हाळुंगी नदीचे उगमस्थान आहे. गेल्या काही दिवसांपासून उगमस्थानात जोरदार पाऊस सुरु झाल्याने नदीला पहिल्यांदा पूर आला होता. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात देखील सातत्याने वाढ होण्यास सुरुवात झाली होती.

मंगळवारी सायंकाळी धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाला होता. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ४८३ दशलक्ष घनफूट क्षमता असलेले भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

धरणातील पाणीसाठा तसेच सांडव्याद्वारे वाहणारे पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणी योजनांची चिंता मिटली आहे. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने पूर्व भागातील लाभक्षेत्रात चारीद्वारे पूरपाणी सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!