अहिल्यानगर- स्वस्तात प्लॉट देण्याचे आमिष दाखवून लोक मंगल गृहनिर्माण संस्थेच्या नावाखाली शंभर पेक्षा जास्त कष्टकरी, पोलिस, पत्रकार यांचे पैसे गोळा करून प्लॉट न देता फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात संशयित पोलिस अंमलदाराला कोतवाली पोलिसांनी आज अटक केली. त्या अगोदर भागीदार सामाजिक कार्यकर्त्याला अटक करण्यात आलेली आहे.
संशयित आरोपी पोलिस अंमलदार अशोक बाळू पुंड (रा. साई गजानन कॉलनी, लेखानगर, सावेडी) असे त्याचे नाव आहे. दुसरा संशयित आरोपी प्रकाश भुमय्या कोटा (रा. बालाजी सोसायटी कल्याण रस्ता, अहिल्यानगर) याला पूर्वीच अटक करण्यात आलेली आहे.

याबाबत कैलास नामपेल्ली उषाकोयल (वय ६१, रा. झारेकर गली, अहिल्यानगर) यांनी १२ जून रोजी कोतवाली पोलिसात दाखल केली होती.
उषाकोयल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अशोक पुंड व प्रकाश कोटा यांच्याशी पूर्वीपासून ओळख होती. त्यांनी २०११ साली ‘लोकमंगल’ गृहनिर्माण संस्था स्थापन करून गरिबांना ५०० चौरस फूटाचे प्लॉट अत्यंत स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
शासनाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर प्लॉट मिळतील, असा विश्वास दिला. विश्वास संपादन करून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांकडून सुमारे ७.२५ लाख रूपयांची रक्कम जमा करण्यात आली. फिर्यादी यांनी वारंवार प्लॉटची मागणी केली मात्र, प्लॉट व पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. चौकशीनंतर गुन्हा दाखल झाला.
गुन्ह्याच्या तपास कोवताली पोलिसांनी प्रकाश कोटा याला अटक केली. त्यानंतर पोलिस अंमलदार अशोक पुंड याला अटक होणार का अशी चर्चा होती. दरम्यान, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी लक्ष घालून कोतवाली पोलिसांना आरोपी अटक करण्याच्या सूचना केल्या. कोतवाली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड यांनी केडगाव परिसरातून त्याला अटक केली. शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.
पोलीस खात्यातून निलंबीत
अशोक पुंड हा जिल्हा पोलीस दलातील अंमलदार असून, त्याची नेमणूक आर्थिक गुन्हे शाखेत होती. मात्र, गुन्ह्याची कुणकुण लागताच ते सुट्टीवर जाऊन गायब झाला होता. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर पोलीस अधीक्षक घार्गे यांनी त्याला खात्यातून तत्काळ निलंबीत केले.