संगमनेर- तालुक्यातील चंदनापुरी घाटाजवळील आनंदवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना शाळेत नेणारी स्कूलबस उलटल्याने चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही बस चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन जात होती.
साकूर पठार भागातील अनेक विद्यार्थी चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना रोज शाळेत नेण्यासाठी विद्यालयाची स्कूल बस वापरली जाते. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बस चंदनापुरी घाटातून आनंदवाडी मार्गे विद्यालयाकडे ३५ विद्यार्थ्यांना घेऊन येत होती. आनंदवाडी शिवारातील एका वळणावर समोरून आलेल्या वाहन चालकाने ओव्हरटेक करताना बसचालकास हुल दिली.

बसचालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला घेतली असता ती साईड गटारात उलटली. या अपघातात तीन ते चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलमताई खताळ, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहणे यांनी तात्काळ चंदनापुरी घाटातील डॉ. आर. एस. गुंजाळ हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली व त्यांना धीर दिला.
या घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने आपल्या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना मदतीचे निर्देश दिले. यानुसार यशोधन कार्यालयाचे प्रमुख तसेच थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात आणि विजय राहणे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी नंतर रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व पालकांना दिलासा दिला.