अकोले-तालुक्यातील देवठाण येथील १०६० दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण गुरुवारी दुपारी १२ वाजता पूर्ण क्षमतेने भरले असून, यामुळे संपूर्ण लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या ६० क्यूसक वेगाने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. जलसंपदा विभागाने ही माहिती जाहीर केली.
या वर्षी जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धरण भरल्याने रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले असून, पिण्याच्या पाण्याचीही चिंता दूर झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गात मोठा आनंद व्यक्त केला जात आहे.

या धरणातून अकोले तालुक्यातील देवठाण, वीरगाव, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी, गणोरे तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, जवळेकडलग, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा, चिकणी, राजापूर, निमगाव भोजापूर, चिखली ही आठ गावे आणि सिन्नर तालुक्यातील चास, नळवाडी व कासारवाडी ही तीन गावे असे एकूण १६ गावे शेतीसाठी या धरणावर अवलंबून आहेत.
याशिवाय, पाच गावांची पाणीपुरवठा योजनाही याच धरणावर आधारित आहे. त्यामुळे धरण भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. लाटांनी सांडव्याच्या बाहेरून पाणी वाहू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकोले उपविभागीय जल अभियंता योगेश जोर्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच शासकीय जलपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.