निसर्गाने आपल्याला दिलेल्या औषधी वनस्पतींचा वापर हजारो वर्षांपासून आयुर्वेदामध्ये केला जातो. आजच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांनी त्रस्त लोक आधुनिक औषधांपेक्षा पारंपरिक उपचारांचा आधार घेऊ लागले आहेत. अशावेळी ‘भूमी आवळा’ नावाची एक साधी वाटणारी पण विलक्षण प्रभावी औषधी वनस्पती पुन्हा चर्चेत आली आहे.

‘भुई आवळा’चे फायदे
आयुर्वेदात ‘भुई आवळा’ ही वनस्पती इतकी महत्त्वाची मानली गेली आहे की, अनेक गंभीर आजारांवर तिचा उल्लेख ‘प्राकृतिक उपाय’ म्हणून केला जातो. यकृताच्या आरोग्यासाठी भूमी आवळा फार प्रभावी मानला जातो. यकृतामध्ये चरबी साठू लागली, कावीळसारखे विकार उद्भवले, किंवा पचन नीट होत नसेल तर अशा सगळ्या समस्यांवर तो एक प्रभावी उपाय ठरतो. त्याच्या नियमित सेवनाने यकृतावर साचलेले विषारी घटक बाहेर पडतात आणि लिव्हरचं कार्य सुरळीत चालू राहतं.
फक्त यकृतच नाही, तर मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ही वनस्पती वरदान आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचं काम ती अगदी नैसर्गिकरीत्या करते. तिच्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि सूज कमी करणारे गुण शरीराच्या इम्युन सिस्टीमलाही बळकट करतात. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या त्रासांपासूनही ती शरीराचं संरक्षण करते. अनेकजण संधिवाताने ग्रस्त असतात, त्यांच्या वेदनांमध्येही ही वनस्पती उपयोगी ठरते. काही तज्ज्ञ सांगतात की, त्वचेसाठीही ही खूप फायदेशीर आहे. पानांची किंवा मुळांची पेस्ट करून त्वचेवर लावल्यास फंगल इन्फेक्शन, खाज, पुरळ यांसारख्या समस्यांमध्ये खूप आराम मिळतो.
भूमी आवळ्याचा वापर कसा कराल?
भूमी आवळ्याचा उपयोग करण्याचे मार्गही सोपे आहेत. तिचं कोरडं पावडर करून पाण्यात मिसळून घेता येतं, काही लोक मधात मिसळून घेतात. काही जण तिचा ताजा रस काढून सकाळी रिकाम्या पोटी घेतात. ताजी पाने उकळून त्याचा काढा बनवता येतो.
आपल्या भागात या वनस्पतीला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. कुठे भुई आवळा, कुठे जंगली आवळा, तर कुठे तमलकी. तिचं शास्त्रीय नाव ‘Phyllanthus Niruri’ असलं तरी ती अगदी घरगुती आहे. तरीही, तिचा वापर करताना काही काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषतः गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता किंवा ज्या व्यक्ती नियमित औषधं घेत असतात त्यांनी आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घेऊनच ती सुरू करावी.