जगात अनेक गावं अशी आहेत, जिथे माणूस आणि निसर्ग यांचं नातं फार गहिरं असतं. पण कर्नाटकच्या पश्चिम घाटात वसलेल्या अगुम्बे या छोट्याशा गावाची कथा याहून वेगळी, थोडी गूढ आणि थोडी अद्भुत वाटावी अशी आहे. कारण इथे नुसताच निसर्ग नाही, इथे माणसांसोबत राहत असतात किंग कोब्रा साप.आणि विशेष म्हणजे, गावकरी त्यांना घाबरत नाहीत, उलट त्यांच्याशी इतक्या आपुलकीने वागतात की सगळ्या जगात हे गाव ‘कोब्रा कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखलं जातं.


अगुम्बे गाव
अगुम्बे हे शिवमोगा जिल्ह्यातलं एक छोटंसं, पण अतिशय घनदाट पावसाळी जंगलांनी वेढलेलं गाव आहे. पावसाच्या प्रमाणामुळे त्याला दक्षिण भारताचं चेरापुंजी असंही म्हटलं जातं. या निसर्गरम्य गावाचं क्षेत्रफळ जेमतेम 3 चौरस किलोमीटर आहे, आणि लोकसंख्या फक्त 500-600. पण ज्या गोष्टीमुळे हे गाव अनोखं ठरतं, ती म्हणजे इथे आढळणाऱ्या सापांची संख्या. अगदी 71 वेगवेगळ्या प्रजातींचे साप इथे सापडतात, आणि त्यातला सर्वात प्रभावी साप म्हणजे किंग कोब्रा.

किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. तो कधी कधी 18 फूटांपर्यंत लांब असतो, आणि विशेष म्हणजे, तो इतर सापांनाच अन्न म्हणून खातो. त्याच्या या वैशिष्ट्यामुळे तो जंगलातील जैवसाखळीचं संतुलन राखतो. हा साप एका विशिष्ट ऋतूमध्ये आपलं घरटंही तयार करतो पाने आणि कुजलेल्या लाकडांनी बनवलेलं, जे खूपच दुर्मीळ आहे. मादी सुमारे 35 ते 40 अंडी देते, पण त्यातील फारशी अंडी वाचत नाहीत, तरीही त्याच्या अस्तित्वाची जबाबदारी अगुम्बेच्या गावकऱ्यांनी हसतमुखाने स्वीकारलेली आहे.

रेडिओ टेलीमेट्री प्रकल्प

अगुम्बेच्या लोकांचं सापांबरोबरचं नातं हे भीतीवर नाही, तर आदरावर आधारित आहे. जर त्यांच्या घरात किंवा वाटेत साप दिसला, तर ते गोंधळ घालत नाहीत. ते लगेच वनविभाग किंवा अगुम्बे रेनफॉरेस्ट रिसर्च स्टेशन (एआरआरएस) यांना कळवतात. या संस्थेची स्थापना सर्पतज्ज्ञ रोमुलस व्हिटेकर यांनी केली आणि त्यांनी भारतात प्रथमच किंग कोब्रावर रेडिओ टेलीमेट्री प्रकल्प सुरू केला. एआरआरएसचा एकच उद्देश आहे सापांचं संरक्षण, संशोधन आणि लोकांमध्ये सर्पांविषयी सकारात्मक जागृती निर्माण करणं.

गावकरी वर्षानुवर्षं सापांबरोबर राहात आहेत, आणि त्यांच्या जीवनशैलीचा तो एक भागच बनलेला आहे. नागपंचमीच्या दिवशी तर सापांची पूजा केली जाते. पण याचबरोबर, लोकांची सापांबद्दल भीतीही लक्षात घेऊन एआरआरएस जागृती मोहिमा राबवतं, शाळांमध्ये जाऊन मुलांना सर्प ओळख शिकवतं आणि प्रत्येकाला समजावतं की साप आपल्याला त्रास द्यायला येत नाही, आपणच त्याच्या मार्गात जातो.

अगुम्बेचं सौंदर्य केवळ सापांपुरतंच मर्यादित नाही. इथे जगात कुठेही न सापडणाऱ्या बुरशीच्या प्रजाती आहेत, मेलिओला अगुम्बेन्सिस आणि तारेना अगुम्बेन्सिससारख्या. तांदूळ आणि सुपारीच्या शेतीव्यतिरिक्त, इथे पारंपरिक हातमाग उद्योगालाही प्रोत्साहन दिलं जातं. अगदी छोटं गाव असलं तरी, ते निसर्गप्रेमी आणि पर्यावरणासाठी झटणाऱ्या लोकांसाठी एक प्रेरणास्थान आहे.