फक्त 20 रुपयांत मिळवा तब्बल 2 लाखांचा विमा, जाणून घ्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे सर्व फायदे!

Published on -

अचानक आयुष्यात काय घडेल, याचा काही नेम नसतो. अपघात, आजारपण किंवा इतर संकटं कोणावर कधी येतील सांगता येत नाही. अशा वेळी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीला काही झालं, तर संपूर्ण घरचंच गणित कोलमडू शकतं. म्हणूनच, सरकारने साध्या आणि किफायतशीर विमा संरक्षणासाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ज्यामुळे अगदी अल्प उत्पन्न असलेल्या लोकांनाही विमा मिळू शकतो. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला फक्त 20 रुपये मोजावे लागतात, पण त्यामागे 2 लाख रुपयांचं कवच मिळतं.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

ही योजना सर्वसामान्य जनतेसाठी 2015 मध्ये सुरू करण्यात आली. त्या वेळेपासून आतापर्यंत जवळपास 51 कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. नुकतीच या योजनेने आपली 10 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली. ही योजना एक वर्षासाठी लागू होते, 1 जूनपासून सुरू होऊन पुढच्या वर्षी 31 मेपर्यंत वैध असते. आणि त्याचा प्रीमियम तुमच्या बँक खात्यातून फक्त 20 रुपये ‘ऑटो डेबिट’द्वारे दरवर्षी वसूल केला जातो. एवढ्या कमी किंमतीत इतकं मोठं संरक्षण मिळणं ही एक मोठी गोष्ट आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारतातला कुठलाही नागरिक असू शकता, फक्त तुमचं वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसेच, तुमचं खाते कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत असणं गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे, तुम्ही या योजनेत सहभागी होण्यासाठी कोणतीही वैद्यकीय तपासणी करावी लागत नाही. म्हणजेच, ज्यांना इतर कंपन्यांकडून विमा मिळत नाही अशा व्यक्तींनाही यामधून संरक्षण मिळू शकतं.

अर्ज करण्याची प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रियाही खूप सोपी आहे. तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन फॉर्म भरू शकता किंवा अनेक बँकांच्या वेबसाईट्सवरून ही सेवा ऑनलाइनही मिळू शकते. फक्त लक्षात ठेवा की तुमच्या एकाच बँकेतून या योजनेसाठी नोंदणी झालेली असावी.

जर पॉलिसीधारकाचा एखाद्या अपघातात मृत्यू झाला, तर नामनिर्देशित व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतात. पूर्ण अपंगत्व आल्यास देखील हीच रक्कम दिली जाते. आंशिक अपंगत्व, जसं की एका हाताचा, डोळ्याचा किंवा पायाचा वापर शक्य नसेल, अशा स्थितीत 1 लाख रुपयांची रक्कम मिळते. मात्र आत्महत्या झाल्यास, ही योजना लागू होत नाही. आणि या योजनेअंतर्गत रुग्णालयात उपचाराचा खर्च भरला जात नाही, ही बाब लक्षात ठेवायला हवी.

विमासाठी आवश्यक कागदपत्रं

अपघात किंवा मृत्यू झाल्यास, त्याचा तपशील संबंधित संस्थेला दिला गेला पाहिजे. ट्रेन अपघात, पाण्यात बुडणे, रस्ता अपघात, खून अशा प्रकरणांमध्ये पोलिस रिपोर्ट आवश्यक असतो. तर साप चावणे, झाड कोसळणे, घर पडणे यासारख्या घटनांमध्ये रुग्णालयाची नोंद आवश्यक आहे. यानंतर, सादर केलेली कागदपत्रं तपासून कंपनी संबंधित खात्यात विम्याची रक्कम जमा करते.

अशा प्रकारे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अत्यंत कमी खर्चात सामान्य माणसाला दिलासा देणारी आणि संकटाच्या काळात आधारभूत ठरणारी योजना आहे. विशेषतः अशा व्यक्तींसाठी, ज्यांच्याकडे महागड्या विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी मोठं बजेट नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!