जग एक दिवस संपुष्टात येईल, असा विचार अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये आणि परंपरांमध्ये मांडलेला आहे. अनेक धर्मांत “प्रलय” म्हणजे सर्वकाही नष्ट होण्याचा एक अंतिम काल म्हटला जातो, जेव्हा नद्या समुद्र बनतात, पर्वत कोसळतात आणि मानवी संस्कृतींचे अस्तित्वच उरत नाही. मात्र, या सर्व विनाशातूनही एक ठिकाण असे आहे जे कधीही नष्ट होणार नाही, असे मानले जाते आणि ते ठिकाण म्हणजे काशी.

हिंदू परंपरेनुसार, काशी ही केवळ एक प्राचीन नगरी नाही, तर ती भगवान शिवांचे विशेष निवासस्थळ आहे. इथे कोणत्याही धर्मप्रेमीने एकदा तरी पाऊल ठेवलेलं असतं. या शहराला “अविनाशी काशी” म्हणण्यामागे केवळ त्याचे पौराणिक महत्त्वच नाही, तर त्यामागे एक गूढ श्रद्धा दडलेली आहे, की जरी संपूर्ण पृथ्वी विनाशाच्या गर्तेत गेली, तरी काशी कायमस्वरूपी सुरक्षित राहील.
काशी नगरी
कथेनुसार, काशी पृथ्वीवर अस्तित्वात असलेले एकमेव असे क्षेत्र आहे जे भगवान शिवांनी स्वतः त्रिशूळावर धरलेले आहे. प्रलयाच्या वेळी, जेव्हा सगळं काही जलमय होतं, तेव्हा शिव त्रिशूळाने काशीला वर धरून ठेवतात, ज्यामुळे ते पाण्याखाली जात नाही. ही फक्त कल्पनाच नाही, तर लाखो भक्तांच्या मनात खोलवर रुजलेली श्रद्धा आहे.
‘स्कंद पुराण’ या प्राचीन ग्रंथात याचा उल्लेख विशेष आहे. त्यात म्हटले आहे की काशी म्हणजे “अविमुक्त क्षेत्र” म्हणजेच एक असे स्थान जे कधीही त्याच्या पवित्रतेपासून वंचित होत नाही. स्वर्ग, पृथ्वी आणि अधोलोक या तिन्हीही लोकांमध्ये काशीला एक खास स्थान प्राप्त झाले आहे. स्कंद पुराण सांगते की, प्रत्येक युगात काशीचे रूप वेगळे असते.सत्ययुगात ती त्रिशूळाच्या आकारात दिसते, त्रेतायुगात चक्राच्या, द्वापारयुगात रथाच्या आणि कलियुगात शंखाच्या आकारात. या अद्भुत रूपांतूनच तीच्या शाश्वततेची कल्पना होते.
“मोक्षाचे द्वार” असलेली काशी
काशीला “मोक्षाचे द्वार” असेही म्हटले जाते, कारण येथे प्राण सोडल्यास थेट मोक्ष मिळतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे येथे दरवर्षी हजारो लोक शेवटचा श्वास घेण्यासाठी येतात. हे शहर फक्त धार्मिक महत्त्वाचं नाही, तर अध्यात्मिक प्रकाशाचंही केंद्र आहे. म्हणूनच काशीचा उल्लेख “ज्ञानाची भूमी” असाही केला जातो.
या श्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी, काशी फक्त एक भौगोलिक ठिकाण नाही, ती एक श्रद्धेची अनुभूती आहे. एक अशा नगरीची भावना आहे, जिथे मृत्यू देखील सुटका वाटतो, आणि जिथे प्रलयासारखा विध्वंस सुद्धा थांबून राहतो.