मुुख्यध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचे ३ दिवसांपासून आंदोलन, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

Published on -

अहिल्यानगर- कापड बाजार येथील लक्ष्मी भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची बदली रद्द होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह पालकांचे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालयात आंदोलन सुरू होते. अखेर संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या ठोस आश्वासनाने आंदोलन स्थगित करण्यात आले.

नुकतीच शाळा सुरु होऊन काही दिवस उलटले असताना मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची अचानक बदलीचा आदेश आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी पालक संघ समितीच्या माध्यमातून मंगळवार (दि.१ जुलै) पासून बुरुडगाव रोड येथील संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालयाच्या आवारात आंदोलन सुरु केले होते. विद्यार्थी व पालकांनी शाळेवर देखील बहिष्कार टाकल्याने शाळा विद्यार्थ्यांशिवाय भरत होती. सलग तीन दिवस झालेल्या या आंदोलानवर शनिवारी (दि.५ जुलै) तोडगा काढून आंदोलन मागे घेण्यात आले.

संस्थेच्या वरिष्ठ पातळीवरुन आंदोलनाची दखल घेऊन यावर सकारात्मक आश्वासन देण्यात आले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती पालक संघ समितीच्या वतीने देण्यात आली. विद्यार्थी व पालकांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. सोमवारपासून नियमीत शाळा भरणार असून, सर्व विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!