आपण अनेकदा बॉर्डरवरील तणावाच्या बातम्या ऐकतो, पण त्या तणावाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडे असलेली शस्त्रसज्जता किती सक्षम आहे, याचं खरं उत्तर अपाचेसारख्या अत्याधुनिक हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरकडे पाहिलं की मिळतं. अगदी अलीकडेच भारतीय लष्करात सामील झालेलं बोईंग एएच-64ई अपाचे हे असं एक हेलिकॉप्टर आहे, जे जगातल्या सर्वांत घातक अटॅक हेलिकॉप्टरपैकी एक मानलं जातं. या महिन्यातच अपाचेंची नवीन तुकडी भारतीय सीमांवर, विशेषतः पाकिस्तानच्या सीमेवर तैनात केली जाणार आहे. त्याच्या आगमनामुळे भारताचं सामरिक बळ आणखी मजबूत झालं आहे.

बोईंग एएच-64 अपाचे
बोईंग एएच-64 अपाचेबाबत बोलायचं झालं तर, याचं नाव घेताच युद्धभूमीवर थरकाप उडवणारा आवाज डोळ्यासमोर येतो. या हेलिकॉप्टरमध्ये 30 मिमी एम230 चेन गन बसवलेली आहे, जी अवघ्या एका मिनिटात 625 राउंड फायर करू शकते. याशिवाय, लेसर-गाइडेड हेलफायर मिसाईल्स, रात्री सहज काम करणारी अचूक लक्ष्यीकरण प्रणाली आणि बहुपर्यायी मिशन क्षमता अशा अद्वितीय गोष्टींमुळे अपाचेला कोणत्याही लढाईसाठी सर्वोत्तम बनवलं आहे. अमेरिकेनंतर भारत, इस्रायल, ब्रिटनसारखे देशही अपाचे वापरत आहेत, आणि अफगाणिस्तान व इराकमधील युद्धात याच हेलिकॉप्टरने निर्णायक भूमिका बजावली होती.
रशियाचे कामोव Ka-52
रशियाचं कामोव Ka-52 ‘अॅलिगेटर’ हे आणखी एक धोकादायक हेलिकॉप्टर आहे. हे संपूर्ण हवामानात ऑपरेट होणारे आणि शत्रूच्या टाक्यांवर हल्ला करण्यासाठी डिझाइन केलेलं अत्याधुनिक यंत्र आहे. याची वैशिष्ट्यं पाहिली तर हे केवळ एक हल्ला करणारे यंत्र नसून एक पाळत ठेवणारा आणि हवाई नियंत्रणाचा आधार देणारा प्लॅटफॉर्मसुद्धा आहे.
चीनचे Z-10 हेलिकॉप्टर
चीनने स्वतः विकसित केलेले Z-10 हे हेलिकॉप्टर देखील या शर्यतीत मागे नाही. रशियन डिझाइनच्या आधारावर तयार झालेलं हे ट्विन-इंजिन हेलिकॉप्टर मुख्यतः अँटी-टँक मिशन्ससाठी वापरलं जातं. हवेतून हवेत युद्ध करण्याचीही त्याची क्षमता आहे. 2012 पासून हे चिनी सैन्याचा भाग आहे. पाकिस्ताननेही याच्या एका प्रकाराचा वापर सुरू केला आहे, त्यामुळे दक्षिण आशियातील सामरिक तणाव आणखी गडद होतोय.
युरोकॉप्टर टायगर
तसेच फ्रान्स, स्पेन, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये वापरलं जाणारं युरोकॉप्टर टायगर हे हेलिकॉप्टर विशेषतः बहुपर्यायी मिशन्ससाठी बनवलं गेलं आहे. अफगाणिस्तान, लिबिया आणि मालीमध्ये त्याचा यशस्वी वापर झाला आहे. हे युरोपमध्ये तयार झालेलं पहिलं सर्व संमिश्र हेलिकॉप्टर मानलं जातं.
Mi-28NM ‘हावोक’
रशियाचंच आणखी एक अत्याधुनिक हेलिकॉप्टर Mi-28NM ‘हावोक’ आता पाचव्या पिढीत प्रवेश करत आहे. अँटी-आर्मर क्षमतेने सुसज्ज, हे हेलिकॉप्टर ताशी 600 किमी पर्यंत वेगाने उडण्यास सक्षम आहे. रशियन लष्कराने त्याच्या प्रगततेवर विश्वास टाकत तो ताफ्यात कायमस्वरूपी सामील केला आहे.