दरमहा SIP साठी किती रक्कम कट होतेय? एकूण किती पैसे जमा झाले?, आता घरबसल्या मोबाइलवर मिळवा SIP चे सर्व रेकॉर्ड!

Published on -

सततच्या महागाईच्या काळात, म्युच्युअल फंड हे एक समजूतदार गुंतवणुकीचं साधन ठरतं आहे. SIP म्हणजे नियमित रक्कम गुंतवण्याची शिस्तबद्ध पद्धत. लहान रकमेपासून सुरूवात करून दीर्घकाळात मोठा फंड तयार करता येतो. पण अनेक गुंतवणूकदारांना नेहमीच एक प्रश्न असतो ‘‘मी दर महिन्याला रक्कम वजा करतोय, पण आजपर्यंत एकूण किती पैसे जमा झाले? आणि त्याचं मूल्य काय आहे?’’ याचं उत्तर मिळवण्यासाठी अनेक जण सल्लागारांची मदत घेतात. पण आता गरज नाही.

कारण घरबसल्या, केवळ पॅन नंबर टाकून तुम्ही तुमच्या सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) चा संपूर्ण हिशेब पाहू शकता. किती पैसे दरमहा वजा झाले, आतापर्यंत किती गुंतवणूक झाली, आणि त्यावर किती परतावा मिळाला हे सगळं काही सेकंदात तपासता येतं. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी ही माहिती समजून घेणं आता पूर्वीसारखं गुंतागुंतीचं राहिलेलं नाही. CAMS, KFintech, MF Central अशा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या सर्व फंडांची एकत्रित माहिती एका क्लिकवर मिळू शकते. आणि ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

‘असं’ तपासा SIP रेकॉर्ड

जर तुमच्याकडे तुमचं पॅन कार्ड आहे आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक त्याच्याशी लिंक केलेली आहे, तर तुम्ही घरबसल्या तुमचं संपूर्ण पोर्टफोलिओ पाहू शकता. यासाठी, तुम्ही CAMS, KFintech, MF Central, NSDL किंवा CDSL यांच्या अधिकृत वेबसाइट्सपैकी कोणत्याही एका वेबसाइटवर जाऊ शकता. तिथं तुम्हाला ‘Request CAS’ किंवा ‘View Portfolio’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुमचा पॅन नंबर, जन्मतारीख, रजिस्टर केलेला ईमेल आणि मोबाईल क्रमांक टाका. त्यावर आलेला OTP भरल्यानंतर तुमचं Consolidated Account Statement तयार होईल.

या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला कुठल्या फंडात कधी किती रक्कम गुंतवली, सध्याचे युनिट्स, त्याची किंमत, आतापर्यंत मिळालेला परतावा, कर, भांडवली नफा आणि इतर सर्व माहिती स्पष्टपणे दिसते. तुमचं SIP सुरू आहे का, कधी थांबवले, त्याचे फायदे काय आहेत हेही यातून कळते.

जर तुम्हाला यात काही चूक जाणवत असेल म्हणजेच एखादी गुंतवणूक दिसत नसेल, यादीतील माहिती जुळत नसेल, किंवा KYC अपडेट नसेल, तर तुम्ही त्याच वेबसाइटवर जाऊन तक्रार करू शकता आणि अपडेट प्रक्रिया पूर्ण करू शकता.

SIP कधी सुरू करावी?

पण फक्त माहिती मिळवणं पुरेसं नाही. तुम्ही कुठल्या फंडात गुंतवणूक करता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. काही जण बाजार वाढत असताना उत्साहात गुंतवतात, पण बाजार खाली येताच पैसे काढतात आणि इथेच नुकसान होतं. म्युच्युअल फंड ही दीर्घकालीन शर्यत आहे. तुम्ही जितका संयम बाळगाल, तितका फायदा मिळतो.

सर्वात महत्त्वाचं गुंतवणूक लवकर सुरू करा. वयाच्या 20 व्या वर्षातच SIP सुरू केल्यास 40 व्या वर्षी तुमच्याकडे मोठा फंड तयार होतो. कारण इथे काम करते ‘चक्रवाढीची शक्ती’. आणि तेच तुमचं आर्थिक भविष्य मजबूत करतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!