श्रीगोंदा-कोर्टातील दाखल दाव्याच्या कारणावरून महिलेला माझी व्हीडीओ शुटींग काढती काय ? असे म्हणत मारहाण करून डोक्याला पिस्तूल लावत महिलेसह तिच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण काढून नेले. सुदैवाने या घटनेत पिस्तूलमधील गोळी अडकल्याने पुढील अनर्थ टळला.
याप्रकरणी सुरेखा मच्छिद्र झेंडे (वय ४५, रा.चिखली यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात गणेश झेंडे, महेश झेंडे, योगेश झेंडे सर्व रा. चिखली, कृष्णा (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांसह एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी या घरी असताना आरोपींनी कोर्टातील दाखल दाव्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आरोपी गणेश झेंडे याने फिर्यादी महिलेला माझी व्हीडीओ शुटींग काढती काय? असे म्हणत डोक्याला पिस्तूल लावत तुला जिवंत ठार मारीन, असे म्हणून पिस्तुलाचे बटण दाबले; परंतू सुदैवाने पिस्तूलमधील गोळी बाहेर आली नाही.
या वेळी आरोपीने तुझा पती कोठे आहे, असे विचारत दोन वेळा माझ्या तावडीतून सुटलाय त्याचा गेमच करायचाय, असा दम देत फिर्यादी महिलेला मारहाण करत गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण काढून नेले.याप्रकरणी अधिक तपास बेलवंडी पोलिस करत आहेत.