श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव, श्रद्धा आणि अध्यात्माने भारलेले दिवस. या महिन्याला फक्त एक धार्मिक पर्व मानून न चालता, तो मन आणि जीवन शुद्ध करणारा एक सुंदर काळ मानला जातो. विवाहित महिलांसाठी तर श्रावण विशेष महत्त्वाचा असतो. असा विश्वास आहे की या काळात केलेल्या विशेष धार्मिक कृती भोलेनाथ आणि माता पार्वतीला अतिशय प्रिय असतात, आणि त्या महिलांच्या आयुष्यात अखंड सौभाग्य, प्रेम आणि समृद्धी आणतात.
श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध मनाने शिवलिंगावर पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. ही एक साधीशी कृती असली तरी तिच्यामध्ये अपार श्रद्धा आणि भावनांचा ओघ असतो. पाणी अर्पण करताना ‘ॐ नमः शिवाय’ हा जप मनापासून केला, तर त्याचा मानसिक शांतीवर सकारात्मक परिणाम होतो. काही स्त्रिया यासोबत शिव चालीसा वाचतात, तर काही मंडळी दिवसभर ‘हर हर महादेव’चा गजर करत आपल्या भक्तीला अधिक गहिरं करतात.

हिरव्या बांगड्या
हिरव्या बांगड्या हा श्रावण महिन्याचा एक महत्वाचा भाग आहे. हिरवा रंग निसर्गाचं प्रतीक आहे नवजीवन, समृद्धी आणि शांततेचं. या महिन्यात हिरव्या बांगड्या परिधान केल्याने एक प्रकारचा सकारात्मक भाव मनात तयार होतो आणि आई गौरीही प्रसन्न होते, असा लोकविश्वास आहे.
सोळा शृंगार
सोळा शृंगार म्हणजे सौंदर्य आणि श्रद्धेचा संगम. विवाहित महिलांनी दररोज न झालं तरी किमान श्रावणात काही दिवस तरी पारंपरिक शृंगार करावा. यात बांगड्या, कुंकू, बिंदी, मंगळसूत्र, मेहंदी अशा गोष्टींचा समावेश असतो. केवळ सजण्यासाठी नाही, तर या प्रत्येक गोष्टींमध्ये नात्यांचा बंध अधिक मजबूत करणारी आध्यात्मिक भावना दडलेली असते.
विशिष्ट रंगाचे वस्त्र
श्रावणात परिधान केलेले कपडेही त्याच भावनेने निवडले जातात. हिरवा, पिवळा, गुलाबी, लाल हे रंग आनंद, प्रेम आणि समृद्धीचं प्रतीक मानले जातात, तर काळा, राखाडी आणि तपकिरी रंग श्रावणसारख्या पवित्र महिन्याच्या वातावरणात अशुभ मानले जातात. त्यामुळे या काळात पोशाख निवडताना थोडी अधिक काळजी घेणं योग्य ठरतं.
भगवान शिवाची पूजा
या महिन्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे भक्तिभावाने भरलेली भगवान शिवाची पूजा. काहीजण सोमवारचे उपवास करतात, काही ‘महामृत्युंजय मंत्र’ जप करतात, तर काही कीर्तनात सहभागी होतात. पूजेमागील भावना ही आहे की नात्यांमध्ये स्थैर्य राहावं, पती-पत्नीमध्ये प्रेम वाढावं, आणि घरात शांती नांदावी.
मेकअपच्या वस्तूंचे दान
एक वेगळी पण मनाला भिडणारी प्रथा म्हणजे मेकअपच्या वस्तूंचं दान. हे ऐकताना भौतिक वाटेल, पण त्यामागची भावना म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात सौंदर्य भरून देणं. गरजू महिलेला काजळ, बांगड्या, कुंकू यांसारख्या वस्तू देणं म्हणजे तिच्या वैवाहिक आयुष्यात सौभाग्याचे रंग भरणं.
श्रावण म्हणजे फक्त बाह्य पूजाच नाही, तर आतूनही शुद्ध होण्याचा काळ. आपल्या वागण्यात संयम ठेवणं, राग, लोभ, द्वेष यांना दूर करणं आणि मनात शुभ भावनांचा संचार होऊ देणं देखील भोलेनाथाची खरी पूजा आहे. स्वतःवर नियंत्रण ठेऊन, अंतर्मन शांत ठेऊन जेव्हा आपण भक्ती करतो, तेव्हाच ती खरी श्रावणातील साधना ठरते.