महिलांच्या शरीरात जणू एक वेगळीच सृष्टी असते. जिथे हार्मोन्स वेगळ्या तालात काम करत असतात, आणि आजार देखील कधी कधी वेगळ्या चेहऱ्याने समोर येतात. हृदयविकाराचा झटका ही त्यातीलच एक गोष्ट. आपण ऐकत आलो आहोत की छातीत तीव्र वेदना, थरथर, घाम येणे ही हृदयविकाराची स्पष्ट लक्षणं असतात. पण ही माहिती बहुतेक वेळा पुरुषांवर आधारित असते. महिलांमध्ये मात्र ही लक्षणं इतकी गोंधळात टाकणारी असतात की ती वेळेत ओळखली जात नाहीत आणि त्यामुळेच अनेकदा जीवावर बेतण्याची वेळ येते.

भारतामधील हृदयविकाराचा धोका
अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या एका अभ्यासानुसार, भारतात सुमारे 3 ते 13 टक्के महिलांना कोरोनरी आर्टरी डिसीज आहे. ही बाब चिंतेची आहे कारण गेल्या काही वर्षांत या संख्येत तब्बल 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातून हे स्पष्ट होतंय की, आपल्या देशातील महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढतो आहे. विशेष म्हणजे भारतीय महिलांमध्ये हृदयविकार येण्याचं सरासरी वय सुमारे 59 वर्षांपर्यंत खाली आलं आहे, जे विकसनशील देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
पण इतकंच नव्हे, ही लक्षणं समजून घेणं आणि त्यांना योग्य वेळी गांभीर्याने घेणं ही खरी गरज आहे. बऱ्याचदा महिला पोटात किंवा कंबरेत दुखतंय, थोडी मळमळ होतेय, थोडा थकवा जाणवतोय असं म्हणतात आणि आपणही ते आम्लपित्त किंवा कामाच्या थकव्याचं कारण समजतो. पण हीच लक्षणं त्यांच्या हृदयातून आलेली चेतावणी असू शकते. काही महिलांना जबड्यात, पाठीवर किंवा खांद्यावर दुखण्याची तक्रार असते. काहींना श्वास घेण्यात अडचण, थोडं चक्कर येणं, किंवा अशक्त वाटणं आणि आपण याकडे फारसं लक्ष देत नाही.
हृदयविकाराची लक्षणे
या लक्षणांचा वेगळेपणा त्यांच्या शरीरशास्त्राशी जोडलेला असतो. महिलांचे हार्मोन्स, विशेषतः इस्ट्रोजेन, त्यांच्या हृदयाच्या आरोग्यावर प्रभाव टाकतात. रजोनिवृत्तीच्या काळात या हार्मोनमध्ये मोठा बदल होतो आणि त्यामुळे हृदयविकाराची लक्षणं धूसर आणि असामान्य स्वरूपात दिसतात. त्यातच लहान रक्तवाहिन्यांमध्ये होणारे बदल, जसे मायक्रोव्हेस्क्युलर डिझीज, अधिक क्लिष्ट लक्षणं निर्माण करतात.
याशिवाय, आधुनिक जीवनशैलीचा महिलांवर होणारा परिणाम देखील कमी नाही. ऑफिसमध्ये सततचा ताण, वेळेचं नियोजन, घर आणि करिअर यांचं दडपण यामुळे मानसिक आरोग्यावर ताण येतो आणि हृदयावरही परिणाम होतो. अशा तणावपूर्ण परिस्थितीत झोप न लागणे, अचानक थकवा जाणवणे, किंवा कामाच्या मध्येच दम लागणे यांसारखी लक्षणं हलक्यात घेतली जातात, पण ती भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकतात.
महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या लक्षणांकडे गांभीर्याने पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या आईला, बहिणीला किंवा पत्नीला जर असे बदल जाणवत असतील, तर त्वरित हृदयविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आजार वेळेत ओळखला गेला, तर त्यावर नियंत्रण मिळवता येतं. पण दुर्लक्ष झालं, तर ही चूक जीवावर बेतू शकते.