छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व उभं राहतं, एक दूरदृष्टी असलेला शासक, प्रजेच्या कल्याणासाठी सतत झगडणारा राजा. पण बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की ‘छत्रपती’ हे त्यांचं नाव नव्हे, तर त्यांच्या शौर्य, कर्तृत्व आणि स्वराज्य स्थापनेच्या यशाची अधिकृत मान्यता असलेली एक राजसन्मान पदवी आहे. आणि ही गौरवशाली पदवी त्यांना देण्यात आली होती एका अतिशय ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणी म्हणजेच रायगड किल्ल्यावर.

रायगड किल्ला
6 जून 1674 हा दिवस महाराष्ट्राच्या, नव्हे तर भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. याच दिवशी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक पार पडला आणि त्यांना ‘छत्रपती’ ही पदवी देण्यात आली. हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तर स्वराज्याच्या घोषणेस अधिकृत स्वरूप देणारा ऐतिहासिक क्षण होता. रायगड म्हणजे केवळ एक किल्ला नव्हे, तर हिंदवी स्वराज्याचं केंद्रबिंदू, एक असा गड जिथून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं ध्येय मूर्त स्वरूपात साकारलं.
रायगड किल्ला आधी रायरि नावाने ओळखला जायचा आणि 1653 मध्ये शिवाजी महाराजांनी तो चंद्रराव मोरे यांच्याकडून जिंकल्यानंतर त्याचं नाव बदलून ‘रायगड’ ठेवलं. हेच ठिकाण त्यांनी राजधानी म्हणून निवडलं आणि इथूनच त्यांनी स्वतःचं स्वतंत्र राज्य उभं केलं. या किल्ल्याचं स्थान, त्याचं वास्तुशास्त्र, संरक्षणासाठी केलेली बांधणी हे सर्व काही इतकं भक्कम आहे की त्यामुळे रायगडाला ‘दुर्गराज’ म्हणजे किल्ल्यांचा राजा असं म्हटलं जातं.
राज्याभिषेकाच्या दिवशी रायगड गड दिव्यांनी उजळला होता. त्या वेळचा संपूर्ण विधी, ब्राह्मणांचा वेदघोष, सिंहासनावर विराजमान होताना शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरचं तेज याचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे. आज रायगडावर गेलं की अंगावर शहारे येतात. जगदीश्वर मंदिराजवळ शिवाजी महाराजांची समाधी आहे, आणि त्याच ठिकाणी त्यांच्या समवेत राहिलेल्या श्वानाचीही समाधी आहे, जी त्यांच्या निष्ठेचं प्रतीक मानली जाते. गंगासागर तलाव, बाजारपेठ, महाल, माजी दरबार हे सर्व बघताना असं वाटतं की आपण इतिहासाच्या काळात परत गेलो आहोत.
रायगडावर कसं जाता येईल?
रायगडावर जायचं असेल, तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पुणे आणि मुंबई ही दोन प्रमुख शहरे जवळ आहेत, आणि तिथून बस, ट्रेन किंवा कारने रायगड गाठता येतो. रोहापासून रायगड फार दूर नाही, आणि नजीकच्या लोणावळा, पनवेल स्थानकांवरूनही पोहोचता येतं. जर थेट किल्ल्याच्या पायथ्याला जायचं असेल, तर रायगड रोपवेही एक उत्तम अनुभव देतो. पर्वतरांगांमधून सरळ किल्ल्यावर पोहोचण्याचा हा मार्ग थरारकही आहे आणि सोयीचाही.