भारतीय रेल्वे ही केवळ प्रवासाचं साधन नाही, ती एका अर्थानं भारताची नाडी आहे. देशाच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून कोट्यवधी माणसं रोज या रेल्वेच्या मार्गांवरून प्रवास करत असतात. आणि या अफाट नेटवर्कमध्ये एक स्टेशन असं आहे, जे केवळ वर्दळीचं नव्हे, तर इतिहास, वास्तुकला आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीतही आपल्या वेळेपेक्षा कितीतरी पुढं आहे, ते म्हणजे हावडा रेल्वे स्टेशन.

हावडा रेल्वे स्टेशन
पश्चिम बंगालमधल्या हुगळी नदीच्या पश्चिम तीरावर वसलेलं हावडा स्टेशन, भारताच्या रेल्वे इतिहासातलं एक दैदिप्यमान पान आहे. 1854 मध्ये जेव्हा हे स्थानक पहिल्यांदा उभं राहिलं, तेव्हा फारशा गाड्या नव्हत्या, ना फारसे प्रवासी. पण काळानुसार हाच हावडा स्टेशन, पूर्व भारताचं सर्वात मोठं आणि व्यस्त केंद्र बनलं. ब्रिटिश स्थापत्यशैलीत बांधलेली लाल विटांची इमारत अजूनही तितकीच भव्य दिसते, आणि ‘बोरो घोरी’ म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारावरील मोठं घड्याळ अजूनही हजारो प्रवाशांना वेळेचं भान देतं.
हावडा हे देशातील एकमेव रेल्वे स्टेशन आहे जे दोन स्वतंत्र रेल्वे झोन पूर्व रेल्वे आणि दक्षिण-पूर्व रेल्वे यांच्या नियंत्रणाखाली चालतं. हे स्टेशन दोन भागांमध्ये विभागलेलं आहे. एक भाग आहे प्लॅटफॉर्म 1 ते 16, जे पूर्व रेल्वेचे आहेत; तर दुसरा भाग म्हणजे प्लॅटफॉर्म 17 ते 23, जे दक्षिण-पूर्व रेल्वेच्या अखत्यारीत येतात. एकूण 23 प्लॅटफॉर्म आणि 26 ट्रॅकसह, हे देशातील सर्वात मोठं आणि सर्वाधिक वर्दळीचं टर्मिनल ठरतं.
10 लाखांहून अधिक प्रवासी करतात प्रवास
या स्थानकावरून दररोज जवळपास 600 गाड्या धावतात आणि 10 लाखांहून अधिक प्रवासी हावडातून आपल्या प्रवासाला सुरुवात करतात. इथून दर मिनिटाला एखादी तरी ट्रेन धावतच असते, आणि त्यामुळे हावडाचं नाव ‘देशातील सर्वाधिक वर्दळीचं रेल्वे स्टेशन’ म्हणून नोंदवलं गेलं आहे. पण हे स्टेशन केवळ वर्दळीपुरतं महत्त्वाचं नाही. 15 ऑगस्ट 1854 रोजी, भारतातली पहिली व्यावसायिक प्रवासी रेल्वे गाडी हावडा ते हुगळी या मार्गावर धावली होती.
देशातील पहिलं ग्रीन स्टेशन
आज हे स्टेशन फक्त रेल्वे वाहतुकीचं केंद्र नाही, तर पर्यावरणपूरकतेचंही उदाहरण बनलं आहे. आयजीबीसीकडून मिळालेल्या ‘प्लॅटिनम ग्रीन स्टेशन’ रेटिंगमुळे हावडा स्टेशन देशातील पहिलं ग्रीन स्टेशन ठरलं. ऊर्जेचा काटेकोर वापर, पाणी बचत आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांनी हे स्थानक आपली जबाबदारी पार पाडत आहे.
हावडाच्या दक्षिणेला असलेलं रेल्वे संग्रहालय हेही पाहण्यासारखं आहे. इथे भारतीय रेल्वेचा इतिहास, जुने इंजिन्स, तांत्रिक उपकरणं आणि प्राचीन रेल्वेगाड्या पाहायला मिळतात. प्रवाशांसाठी हे एक वेगळंच अनुभवस्थान आहे.