नुकताच भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंगसंदर्भात एक मोठा बदल करण्यात आला, आणि त्या बदलाचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागलेत. आयआरसीटीसीनं तात्काळ तिकीटांसाठी नवा नियम लागू केलाय, ज्यामध्ये आधारशी लिंक केलेलं अकाउंट आणि ओटीपी पडताळणी आवश्यक आहे. हा निर्णय घेतला गेला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि दलालांची फसवणूक थांबवण्यासाठी. पण, अनेक दलाल व ब्रोकर्सनी याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर एक नवं रॅकेट सक्रिय झालंय, ज्यात बनावट आधार आणि ओटीपी अवघ्या ₹50 मध्ये विकले जात आहेत.

बनावट OTP रॅकेट
या प्रकारानं आता अनेक प्रवासी संभ्रमात पडले आहेत. ज्यांचं अकाउंट आधारशी लिंक नाही किंवा ज्यांना मोबाईलवर वेळेवर ओटीपी मिळत नाही, अशा घाईत असलेल्या प्रवाशांना हे रॅकेट आपला बळी बनवतंय. सोशल मीडियावर, विशेषतः WhatsApp आणि Telegram सारख्या अॅप्सवर काही ग्रुप्समध्ये हे बनावट ओटीपी आणि आधार क्रमांक खुलेआम विकले जात आहेत. काही गुन्हेगार तर चक्क खऱ्या आधार नंबरवर बनावट मोबाईल नंबर लिंक करून तो OTP वापरतात आणि तिकीटं बुक करतात. हे करताना ते ग्राहकांकडून ₹100 ते ₹500 पर्यंत घेतात. आणि ही प्रक्रिया इतकी गुपचूप आणि व्यवस्थित आखलेली असते की अनेक वेळा सामान्य माणसाला हे लक्षातही येत नाही.
हा सगळा प्रकार फक्त फसवणूक नाही, तर तोटाही मोठा आहे. कारण यात केवळ पैसे जात नाहीत, तर तुमचा आधार डेटा, तुमची ओळख आणि तुमचा विश्वासही डावावर लागतो. या बनावट आधार आणि ओटीपीचा वापर केवळ तिकीट बुकिंगपुरता मर्यादित नाही, तर त्याचा उपयोग अन्य बेकायदेशीर कामांमध्ये होण्याची शक्यता आहे. कधी कधी तर खऱ्या व्यक्तीच्या ओळखीचा गैरवापर होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचीही भीती असते. एवढंच नाही तर हे बॉट्स आणि दलाल हजारो तिकिटं बुक करून टाकतात, ज्यामुळे खरे गरजू प्रवासी रिकाम्या हाताने परत जातात.
रेल्वे प्रशासनाचे महत्वाचे आवाहन
रेल्वे प्रशासनाने या पार्श्वभूमीवर प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की कोणतीही तिकीट बुकिंग केवळ अधिकृत IRCTC पोर्टल किंवा अॅपवरूनच करावी. स्वतःचं आयआरसीटीसी अकाउंट आधारशी लिंक करून ठेवा, आणि कुठल्याही अनोळखी व्यक्तीला किंवा ग्रुपला ओटीपी शेअर करू नका. ही फसवणूक दिसल्यास त्वरित www.cybercrime.gov.in या सायबर पोर्टलवर तक्रार करावी.
रेल्वे आणि UIDAI या दोन्ही संस्था यावर अत्यंत गांभीर्यानं काम करत आहेत. त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की अशा बनावट माहितीचा प्रसार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रामाणिक प्रवाशांना न्याय मिळावा यासाठी हे नियम बनवण्यात आले, मात्र यातील गैरप्रकार समोर आल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का बसलाय.