अहिल्यानगर- ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रीकल इंजिनीअरींग विभागाने यशाची नवी शिखरे गाठली आहेत. संस्थेच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून अलीकडेच घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतींमध्ये एकूण २० विद्यार्थ्यांची नामांकित मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
चतुर्थ वर्ष इलेक्ट्रीकल इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण २८ कंपन्यांच्या वतीने प्लेसमेंट मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची प्रथम योग्यता चाचणी, त्यानंतर तांत्रिक मूल्यांकन व प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. अखेरीस उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, काही विद्यार्थ्यांची चांगल्या पॅकेजसह मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये निवड होऊन त्यांच्या करीयरला भक्कम प्रारंभ मिळाला आहे.

या प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी झालेल्या काही प्रमुख कंपन्यांमध्ये जॉन्सन कंट्रोल्स, फोरेशिया इंडिया प्रा. लि., जारो एज्युकेशन, कॉरीझो, कॉग्नीझंट, कॅपजेमिनी, टीसीएस, हायकुल इलेक्ट्रॉनिक्स, व्हेल्ट्रीक इलेक्ट्रीक व्हेईकल्स, फॉक्स सोल्युशन्स, सुदरलॅण्ड ग्लोबल सर्व्हिसेस, सी. जी. पॉवर, हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज, कोकबन ऑटोमेशन यांचा समावेश होता.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, डायरेक्टर जनरल (प्रशासन) डॉ. पी. एम. गायकवाड, डायरेक्टर-टेक्निकल प्रा. सुनील कल्हापुरे, प्राचार्य डॉ. रवींद्र नवथर, विभागप्रमुख डॉ. अजित लावरे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा. सुदर्शन दिवटे, विभागीय समन्वयक प्रा. राहुल दरंदले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशाचे कौतुक केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरच्या नोकरीच्या संधी मिळवून देणारे हे यश केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद आहे. संस्थेच्या ‘ग्रामीण प्रतिभेला जागतिक व्यासपीठ’ या ध्येयवाक्याची ही ठळक सिद्धता आहे, असे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
संस्थेचे सहकार्य व पालकांच्या प्रोत्साहात यश मिळाले
निवड झालेल्यांत प्रचेता भुसा हिची निवड नगर येथील इपिटॉम कंपोनन्टस प्रा. लि., मनीष गोरे याची फ्लेअर्स सोलर पी. व्ही. सिस्टम्स, तर गणेश आवटे याची लॉरीझ क्नुडसन या अग्रगण्य कंपन्यांमध्ये झाली. या विद्यार्थ्यांनी सांगितले की, ‘महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या संधी, प्राध्यापकांचे मार्गदर्शन, संस्थेचे सहकार्य व पालकांचे प्रोत्साहन यामुळेच हे यश शक्य झाले. आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरेल.’