पावसाळा म्हटलं की निसर्गाची सौंदर्याची उधळण, चिंब हवाचं सुख आणि जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा मनाला भिडणारा ठाव. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाचं मन मोहरवणारा हा ऋतू, आनंदाच्या ओघात अनेकांसाठी आरोग्याच्या कसोटीचा काळही बनतो. विशेषतः दम्याच्या रुग्णांसाठी, पावसाळा हा ऋतू केवळ आव्हानात्मकच नाही, तर कधी कधी प्राणघातकही ठरतो.

या ऋतूमध्ये हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण प्रचंड वाढतं, त्यामुळे बुरशी, धूळ, परागकण आणि विविध प्रकारचे विषाणू सहज पसरतात. दम्याच्या रुग्णांना यांचा फार मोठा फटका बसतो. श्वास घेताना त्रास होणे, छातीत दडपण जाणवणे, सतत खोकला, आणि घसादुखी ही लक्षणं अधिक तीव्र होऊ लागतात. पावसाच्या आगमनाने जितका आनंद निर्माण होतो, तितकीच चिंता या रुग्णांच्या घरात डोकावते.
पावसाळ्यात दम्याच्या रुग्णांत झपाट्याने वाढ
याच विषयावर करण्यात आलेल्या एका अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष समोर आले. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने 2020 मध्ये जगभरातील अनेक संशोधनांचा अभ्यास करून निष्कर्ष काढला की पावसाळ्यात दम्याशी संबंधित तक्रारी सामान्य दिवसांपेक्षा 1.18 पट जास्त वाढतात. लहान मुलं आणि महिला यामध्ये हा धोका अधिक जाणवतो. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असल्यामुळे, आणि महिला घरकामांमुळे सतत ओलसरपणा व बुरशीच्या संपर्कात येत असल्यामुळे त्यांना याचा अधिक त्रास होतो.
हेच संशोधन सांगतं की लहान मुलांमध्ये दम्याचा धोका 1.19 पट आणि महिलांमध्ये 1.29 पट वाढतो. जेव्हा वातावरणात जोरदार वादळ आणि पाऊस असतो, तेव्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या दम्याच्या रुग्णांची संख्या 1.25 पट वाढते. विशेष म्हणजे या काळात मृत्यूचा धोका 2.10 पट वाढतो, आणि ही आकडेवारी नुसती भीतीदायक नाही, तर जागरूक करणारी आहे.
काय काळजी घ्याल?
या परिस्थितीत स्वतःची योग्य काळजी घेणं हेच सर्वात प्रभावी संरक्षण आहे. घरात ओलसरपणा होणार नाही, याची सतत काळजी घेतली पाहिजे. शक्यतो घर कोरडं, स्वच्छ आणि हवेशीर ठेवा. भिंतींवर बुरशी किंवा काळपट डाग दिसू लागले, तर तत्काळ त्यावर उपाय करा. घरातील फर्निचर आणि पडद्यांमध्ये ओलावा साचू देऊ नका.
तसेच, बाहेर जाताना डॉक्टरांनी सांगितलेला इनहेलर किंवा औषधे नेहमी जवळ असावीत. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणं अशा अॅलर्जीक परिस्थितीत फायदेशीर आहे. शक्य असल्यास, अनावश्यक प्रवास किंवा भिजणं टाळा. आणि हो, आहारही याच काळात महत्त्वाचा असतो. तळलेलं, थंड किंवा मागच्या दिवशीचं अन्न टाळा. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घेत राहणं. आपल्याला वाटतं तसं हे केवळ ऋतूमानाशी जोडलेलं तात्पुरतं त्रासदायक प्रकरण नाही, तर योग्य खबरदारी न घेतल्यास आयुष्यावर परिणाम करणारा गंभीर आजार ठरू शकतो.