दक्षिण कोरिया… के-पॉप, के-ड्रामा, बीटीएस आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखला जाणारा देश. पण या देशाची खरी ओळख फक्त मनोरंजनात नाही, तर त्याच्या कामगारांसाठी असलेल्या जबरदस्त कायद्यातही दडलेली आहे. इथे काम करणाऱ्या व्यक्तीचं आरोग्य, आयुष्य आणि सन्मान यांना इतकं महत्त्व दिलं जातं की, जर कुणी बॉस आपल्या कर्मचाऱ्याला आठवड्यातून 52 तासांपेक्षा जास्त काम करायला लावत असेल, तर त्याला थेट तुरुंगात टाकलं जाऊ शकतं. हे ऐकून धक्का बसेल, पण हे खरं आहे.

दक्षिण कोरियातील कायदे
भारतात अनेकदा चर्चा होते की परदेशात लोक किती कठोर परिश्रम करतात 60 तास, 70 तास… पण दक्षिण कोरिया मात्र वेगळाच आदर्श मांडतो. इथे कामाची मर्यादा आहे आठवड्यातून 40 तास नियमित काम आणि जास्तीत जास्त 12 तास ओव्हरटाईम. एवढंच नाही तर, 2018 पासून हा कायदा अधिक कठोर करण्यात आला आहे. पूर्वी जिथे आठवड्याचे कमाल कामाचे तास 68 होते, तिथं आता 52 च्या वर गेलं तर मालकाला तब्बल 20 दशलक्ष वॉनचा दंड आणि 2 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो.
या नियमांचा हेतू स्पष्ट आहे, कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणाला आळा घालणं आणि कामगारांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुरक्षित ठेवणं. कोरियन सोसायटी ऑफ ऑक्युपेशनल मेडिसिननेही सतत होणाऱ्या कामाच्या तासांमुळे हृदयरोग, मेंदूचे आजार आणि अपघात वाढत असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे, कोरियन सरकारने आपल्या कायद्यात विश्रांतीसाठीही ठोस तरतुदी केल्या आहेत.
दक्षिण कोरियामध्ये दररोज 8 तास काम आणि दर आठवड्याला 5 दिवसांचा वेळ निश्चित केला आहे. यामध्ये ओव्हरटाईम करण्यासाठी कर्मचाऱ्याची स्पष्ट संमती आवश्यक आहे आणि त्याच्या मोबदल्यात 150 टक्के वेतन दिलं जातं. रात्री 10 नंतर तर हा मोबदला 200 टक्क्यांपर्यंत वाढतो. इतकंच नाही, तर 4 तासांहून अधिक काम करताना अर्धा तास आणि 8 तासांहून अधिक काम केल्यास 1 तासाचा ब्रेक मिळालाच पाहिजे.
पेड लिव
याशिवाय, सलग 11 तास विश्रांती देण्याची सक्ती आहे, म्हणजे एका दिवसाचा थकवा दुसऱ्या दिवशी ओढत नेण्याची वेळच येत नाही. पगारी रजा हे तर इथं एक हक्काचं सुख आहे. एका वर्षाच्या सेवेनंतर 15 दिवसांची पगारी रजा मिळते, तीही अनिवार्य. मोठ्या नियोक्त्यांसाठी हा नियम 2020 पासून तर लहान व्यावसायिकांसाठी 2022 पासून लागू झाला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची स्थिती तर आणखी चांगली आहे. त्यांना केवळ कमी ओव्हरटाईम करावं लागतं, तर सर्व सार्वजनिक सुट्ट्या पगारी मिळतात. त्यात पेन्शन, आरोग्य विमा आणि अपघात विम्यासारखे अतिरिक्त फायदेही आहेत.
अर्थात, हे सगळं प्रत्येक व्यवसायाला लागू होत नाही. काही छोट्या व्यवसायांनाही नियमांमध्ये काही प्रमाणात सवलती दिल्या जातात. तसेच, आरोग्य सेवा किंवा वाहतूक यासारख्या क्षेत्रांना काही विशेष सूट मिळते– पण त्या परिस्थितीतही कर्मचाऱ्याच्या आरोग्याशी तडजोड करता येत नाही. कमीत कमी 11 तासांची विश्रांती ही सगळ्यांसाठी अनिवार्य आहे.