श्रावण महिना म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि भोलेनाथाच्या चरणी समर्पणाचा काळ. वर्षातील सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या या महिन्याची सुरुवात 11 जुलै 2025 रोजी होत आहे. प्रत्येक भाविक या काळात आपली श्रद्धा वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतो उपवास, रुद्राभिषेक, मंदिरदर्शन आणि जप-तप यांतून. मात्र, केवळ पूजा करूनच शिव कृपा मिळते असं नाही, तर आपल्या घरातील वातावरणही त्यासाठी तयार असणं तितकंच आवश्यक असतं.

श्रावण सुरू होण्यापूर्वी आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात ज्या आपण नकळत ठेवतो आणि त्याचा परिणाम आपल्या मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक आयुष्यावर होतो. अशा काही वस्तू आहेत ज्या शिवभक्ताने श्रावण सुरू होण्याआधी घरातून बाहेर काढल्या पाहिजेत, कारण त्या नकारात्मक ऊर्जा वाढवतातच, पण भोलेनाथाच्या कृपेच्या मार्गात अडथळाही ठरू शकतात.
तुटलेल्या वस्तु
तुटलेल्या वस्तू हे त्यापैकीच एक उदाहरण आहे. घरात तुटलेली भांडी, आरसे, शोपीसेस किंवा फर्निचर ठेवल्यामुळे वातावरणात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. वास्तुशास्त्र देखील सांगते की अशा वस्तूंमध्ये अडकलेली नकारात्मकता तुम्हाला उगाचच मानसिक थकवा देऊ शकते. म्हणून, श्रावणच्या आधी हे सगळं घराबाहेर टाकणं गरजेचं ठरतं.
बंद घड्याळ
अनेक घरांमध्ये जुनी बंद पडलेली घड्याळं अजूनही भिंतीवर लटकलेली असतात. त्या न दिसणाऱ्या काळाच्या ओझ्याप्रमाणे घरातली उर्जा थांबवून ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, बंद पडलेलं घड्याळ एखाद्या गोष्टीत अडकलेपण दर्शवतं आणि त्याचा परिणाम थेट घरातील प्रगतीवर होतो. त्यामुळे जर तुमच्या घरात असं एखादं घड्याळ असेल, तर त्याला आता निरोप द्यायची वेळ आली आहे.
बंद पडलेल्या वस्तु
तसंच, आपण अनेक वेळा जुन्या वस्तू, खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं, मोडकी खेळणी, वापरात नसलेले कपडे, रद्दी हे सगळं एकाच ठिकाणी साठवून ठेवतो. ही सगळी ‘कचऱ्याच्या’ श्रेणीत मोडणारी सामग्री घरातल्या सकारात्मकतेचा गळा घोटू शकते. श्रावणसारख्या पवित्र महिन्यात, जेव्हा आपण भगवंताच्या कृपेसाठी मन:शुद्धी साधत असतो, तेव्हा या बाह्य साफसफाईला दुर्लक्ष करून चालणार नाही.
खराब देवमूर्ती
शेवटची आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुटलेली किंवा खराब झालेली देवमूर्ती किंवा फोटो. अनेकांना वाटतं की जरी देवाची मूर्ती तुटली असली, तरी तिचं पूजन करावं. मात्र वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्र असं सांगतं की ही गोष्ट भगवान शिव किंवा कोणत्याही देवतांचा अपमान ठरू शकते. अशा मूर्ती किंवा चित्रांना योग्य धार्मिक पद्धतीने नदीत किंवा पवित्र पाण्यात विसर्जित करणं ही योग्य मार्गदर्शक कृती आहे.