श्रावण महिन्याची चाहूल लागली की संपूर्ण वातावरणच भक्तिभावाने भारून जाते. मंदिरात ओम नमः शिवायचा जप, भोलेनाथाच्या जलाभिषेकासाठी रांगा, आणि भक्तांच्या मनात फक्त एकच भावना असते, भोलेनाथाला प्रसन्न करण्याची. हा महिना म्हणजे शिवभक्तांसाठी एक पर्वणीच असते. मात्र, या पवित्र महिन्यात भक्तांनी केवळ पूजा केली की झाले असं नाही, तर काही गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते.
शिवलिंगावर अर्पण करण्याच्या काही गोष्टींची मनाई आपल्या धर्मशास्त्रात स्पष्टपणे केली गेली आहे. श्रद्धेने अर्पण केलेली वस्तू भोलेनाथ स्वीकारत असले, तरी काही वस्तू त्यांच्या तत्त्वाशी विसंगत असतात आणि त्यामुळे अज्ञानामुळे अर्पण केलेली अशी सामग्री उलट परिणाम देऊ शकते. त्यामुळे प्रत्येक शिवभक्ताने सावध राहून या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.

हळद
सर्वप्रथम बोलायचं झालं तर हळद. आपल्या पूजा-विधींमध्ये हळद अत्यंत पवित्र मानली जाते. मात्र, भगवान शिवांना हळद अर्पण करणं टाळावं, कारण ते त्यागाचे प्रतीक मानले जातात आणि हळद वैवाहिक शुभतेचा, समृद्धीचा प्रतीक आहे. शिव हे तपस्वी, विरक्त आणि गृहस्थ धर्मापासून दूर असणाऱ्या संकल्पनेचे दैवत असल्यामुळे, त्यांना हळदीचा स्वीकार नाही.
कुमकुम किंवा सिंदूर
याच कारणामुळे कुमकुम किंवा सिंदूरही त्यांना अर्पण करणं वर्ज्य मानलं जातं. या वस्तू विवाहिता स्त्रियांच्या सौभाग्याचं प्रतीक असतात, तर शिव शंकर स्वतः अत्यंत तपस्वी रूपात पूजले जातात. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये कधीही सिंदूराचा वापर करू नये, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
तुळशी
आता आपण तुळशीबद्दल बोलूया. घराघरांमध्ये तुळस ही अत्यंत पूजनीय मानली जाते आणि विष्णुपूजेसाठी तिचा अनिवार्य भाग असतो. मात्र, शिवपूजेमध्ये तुळशीला वर्ज्य मानलं जातं. एक प्राचीन आख्यायिका सांगते की असुर जालंधराची पत्नी वृंदा ही अत्यंत पतिव्रता होती. तिच्या तपोबलामुळे जालंधर अजेय होता. मात्र, त्याला मारण्यासाठी भगवान विष्णूंनी तिचं पतिव्रत्य भंग केलं आणि ती नंतर तुळशी झाली. भगवान शिवांनी जालंधराचा वध केला, म्हणून वृंदेने शिवाला शाप दिला की ती कधीही त्यांच्या पूजेमध्ये स्वीकारली जाणार नाही.
केतकीची फुले
केतकीच्या फुलाची कथा देखील अशाच प्रकारची आहे. ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ या विषयावर वाद झाला असता, भगवान शिवांनी आपलं तेजस्वी रूप ‘ज्योतिर्लिंग’ रूपात प्रकट केलं. ब्रह्मदेवाने खोटं बोलून केतकी फुलाला साक्षीदार केलं आणि तेही खोटं बोललं. यामुळे शिवाने केतकीच्या फुलावर रागावून त्याला शाप दिला की ते त्यांच्या पूजेमध्ये कधीही वापरलं जाणार नाही.
तांदूळ
पुढे, पूजेमध्ये वापरले जाणारे तांदूळ हे शुद्धतेचं प्रतीक असलं, तरी तुटलेले तांदूळ शिवपूजेसाठी अपवित्र मानले जातात. यामागील भावना म्हणजे जे काही आपण भगवंताला अर्पण करतो, ते शुद्ध आणि संपूर्ण असावं, कारण तो आपल्या शुद्ध भावनेचा स्वीकार करतो.
तुटलेली बेलपत्र
बेलपत्र हे शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचं. मात्र, त्याचं स्वरूपही तितकंच महत्त्वाचं आहे. तुटलेली, पिवळी पडलेली किंवा फाटलेली बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करणं अनुचित ठरतं. त्याऐवजी स्वच्छ, हिरवीगार आणि तिन्ही पाने एकत्र जोडलेली बेलपत्र अर्पण करणं हेच योग्य.