वाहनचलकांनो लक्ष द्या! मोबाइलवर ‘हा’ मेसेज आल्यास क्लिक करू नका, अन्यथा एका झटक्यात बँक अकाऊंट होईल रिकामं

Published on -

आजकाल एखादा साधा मेसेजसुद्धा तुमच्या बँक खात्याला रिकामं करू शकतो, हे ऐकून तुमचं डोकं गरगरलं असेल. पण ही बाब खरी आहे. जर तुमच्याही मोबाईलवर ‘ई-चालान’चा एखादा अनोळखी मेसेज आला असेल, तर काळजी घ्या. तो मेसेज केवळ दंड भरण्याविषयी नसून, तुमच्या आर्थिक सुरक्षेवरच घाला घालू शकतो. ही एक अतिशय धोकादायक फसवणूक असून, ती हुबेहुब सरकारी अ‍ॅपसारखी दिसणाऱ्या बनावट अ‍ॅपद्वारे केली जात आहे.

 

‘ई-चालान’चा मेसेज आल्यास क्लिक करू नका

अलीकडेच अनेक नागरिकांच्या मोबाईलवर mParivahan अ‍ॅपच्या नावाने एक लिंक पाठवली जात आहे. ही लिंक पाहता वाटतं की सरकारकडून आलेली आहे. त्यात म्हटलं जातं, “तुमच्यावर वाहतूक नियमभंगासाठी ई-चालान काढले आहे, तपासण्यासाठी इथे क्लिक करा.” आणि यातच सगळं सुरू होतं. जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता, तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये एक बनावट अ‍ॅप डाउनलोड होतं. दिसायला ते खऱ्या mParivahan सारखं असतं, पण प्रत्यक्षात ते एक क्लोन, म्हणजेच बनावट व्हर्जन असतं.

हे अ‍ॅप एकदा फोनमध्ये आलं, की लगेच ते तुमच्याकडून एसएमएस, कॉल लॉग, फोटो, फाइल्स आणि बँकिंग अ‍ॅप्ससाठी परवानग्या मागतं. अनेक जण अशा परवानग्या देताना विचार करत नाहीत, आणि याच क्षणी त्यांच्या फोनचं नियंत्रण स्कॅमरच्या हातात जातं. काही मिनिटांतच, त्यांच्या खात्यातून पैसे गायब होऊ लागतात, ओटीपी चोरी होतात आणि वैयक्तिक फोटो, व्हिडिओ यांचादेखील गैरवापर केला जातो.

ट्रोजन व्हायरस

या घोटाळ्यामागे वापरण्यात येणारा ट्रोजन व्हायरस अत्यंत धोकादायक आहे. तो केवळ एक व्यक्तीच नाही, तर त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या इतर लोकांनाही धोका पोहोचवतो. याचा अर्थ, एक चूक संपूर्ण कुटुंबाला किंवा मित्रपरिवारालाही अडचणीत टाकू शकते.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सावध रहा. अनोळखी एपीके फाईल्स कधीच डाऊनलोड करू नका, मग ती WhatsApp, SMS किंवा ईमेलवर आली असली तरीही. कोणतंही अ‍ॅप फक्त Google Play Store किंवा App Store वरूनच डाउनलोड करा. एखादं अ‍ॅप तुमच्याकडून अनावश्यक परवानग्या मागत असेल, तर त्याला ‘Allow’ करण्याआधी दोनदा विचार करा. बँकिंग अ‍ॅप्ससाठी डबल पासवर्ड किंवा बायोमेट्रिक लॉगिन ठेवा.

जर तुम्ही अशा फसवणुकीचा बळी ठरला असाल, तर वेळ न घालवता थेट 1930 या हेल्पलाईनवर कॉल करा. तसंच cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार दाखल करा. कारण अनेकदा सुरुवातीच्या काही तासांतच नुकसान थांबवता येण्याची शक्यता असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!