म्युच्युअल फंड, नाव ऐकलं की अनेकांना वाटतं की ही मोठ्या गुंतवणूकदारांची गोष्ट आहे. पण खरं पाहिलं, तर थोड्याशा शिस्तबद्ध बचतीमधूनही एक चांगली सुरुवात करता येते. जर तुम्ही पहिल्यांदाच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर ही फक्त संधी नाही, तर जबाबदारी देखील आहे. योग्य माहितीशिवाय उडी मारली, तर या गुंतवणुकीतून फायदा मिळणं कठीण आहे, उलट पैसेही गमावण्याची शक्यता असते.

आजकाल सोशल मीडियावर किंवा मित्रपरिवारात म्युच्युअल फंडाच्या चर्चांची गती वाढली आहे. SIP, NAV, डेट फंड, इक्विटी अशा संज्ञा कानावर येत असतात. परंतु या शब्दांच्या मागचं वास्तव समजून घेतल्याशिवाय फक्त ट्रेंड म्हणून गुंतवणूक करणं, हे पाण्यात न पाहता उडी मारण्यासारखं ठरू शकतं. म्युच्युअल फंड म्हणजे जलद परताव्याचं वचन असं नाही, आणि तो शॉर्टकटही नाही. मात्र शिस्तबद्ध गुंतवणुकीने आणि योग्य समजूतदारपणाने तुम्ही भविष्यात आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि आत्मनिर्भर होऊ शकता.
ध्येय ठरवा
सर्वात पहिलं लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे कोणत्याही फंडात पैसे घालण्याआधी स्वतःचं ध्येय ठरवा. म्हणजेच, ही गुंतवणूक निवृत्तीच्या तयारीसाठी आहे का, शिक्षणासाठी, की घर घेण्यासाठी? या ध्येयानुसारच फंड निवडला पाहिजे. इक्विटी फंड जास्त जोखीम असतात पण दीर्घकाळात चांगले परतावे देतात, तर डेट फंड तुलनेने स्थिर असतात पण परतावे मर्यादित असतात.
पोर्टफोलिओ
दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे पोर्टफोलिओमध्ये विविधता असावी. म्हणजेच, सर्व पैसे एका फंडात किंवा एका प्रकारच्या फंडात न गुंतवता, थोडे-थोडे वेगवेगळ्या फंडात गुंतवावे. यामुळे जोखीम वितरित होते आणि कोणताही एक फंड खराब कामगिरी करत असला, तरी दुसरा फायदा देऊ शकतो.
ठराविक रक्कम गुंतवा
बऱ्याच नवख्या गुंतवणूकदारांची चूक म्हणजे, सुरुवातीलाच मोठी रक्कम गुंतवणं. म्युच्युअल फंडात SIP म्हणजे Systematic Investment Plan हा पर्याय अत्यंत उपयुक्त ठरतो. यात दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवता येते आणि बाजारातील चढ-उताराचा परिणाम सरासरी पातळीवर येतो. त्यामुळे जोखीमही कमी होते आणि गुंतवणुकीचा आत्मविश्वासही वाढतो.
सातत्याने लक्ष ठेवा
पण फक्त गुंतवणूक करून थांबू नका. त्या फंडाची कामगिरी वेळोवेळी तपासणे गरजेचं आहे. फंड कसा काम करत आहे, त्याचा ट्रेंड काय आहे, बाजारातील स्थिती काय आहे हे समजून घेणं अत्यावश्यक आहे. अशा प्रकारे सातत्याने लक्ष ठेवणं तुम्हाला वेळेत योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतं.
दीर्घकालीन दृष्टिकोन
याशिवाय, दीर्घकालीन दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. बाजार कधी वर, कधी खाली होणार यात घाबरून गुंतवणूक थांबवणं चूक ठरू शकतं. कमीतकमी 5 वर्षांचा कालावधी लक्षात घेऊनच फंडात राहणं जास्त फायदेशीर असतं.
आणखी एक गोष्ट तुमचं वय आणि जोखीम घेण्याची क्षमता एकमेकांशी निगडित असते. जर तुम्ही तरुण असाल, तर थोडी जास्त जोखीम घेण्याची मानसिकता ठेवली, तर त्याचे दीर्घकालीन फायदे होऊ शकतात. कारण वेळ तुमच्या बाजूने असतो.
शेवटी, म्युच्युअल फंडात शिस्त आणि सातत्य हे दोन घटक खूप महत्त्वाचे आहेत. गुंतवणुकीमध्ये सलगता असेल, तर तिचं फळ निश्चित मिळतं.