जगात एक शाळा अशी आहे, ज्याच्या फीस आणि शैक्षणिक पद्धतीची जगभर चर्चा होते. या शाळेत एक तास शिकायला तब्बल 1.88 लाख रुपये खर्च करावे लागतात. ही रक्कम भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबाच्या वर्षभराच्या घरखर्चाइतकी आहे. ही शाळा कुठे आहे, काय शिकवलं जातं, आणि इतक्या महाग वर्गांमध्ये मुलं काय शिकतात, हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

‘अॅस्ट्रा नोव्हा स्कूल’
या खास शाळेचं नाव आहे ‘अॅस्ट्रा नोव्हा स्कूल’. ही शाळा एलोन मस्क यांनी सुरू केली आहे. त्याच मस्कने ज्यांनी टेस्ला, स्पेसएक्ससारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची निर्मिती केली आहे. पण ही शाळा कुठल्याही गगनचुंबी इमारतीत किंवा कॉम्प्लेक्समध्ये नसून, पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात चालते. इथे शिकणारी मुलं घरबसल्या शिकतात, पण त्यांचा अनुभव एखाद्या विज्ञान प्रयोगशाळेसारखा असतो.
अॅस्ट्रा नोव्हा ही पारंपरिक शिक्षणपद्धतीपासून पूर्णपणे वेगळी आणि ‘प्रायोगिक’ शाळा आहे. इथे ना परीक्षा असतात, ना गुण मिळतात, ना शालेय गणवेश असतो आणि ना पुस्तकांचा भार. शिक्षण म्हणजे स्पर्धा नाही, तर ज्ञानासाठीचा प्रवास या तत्वावर ही शाळा उभी आहे. या शाळेत तुम्ही पूर्णवेळही शिकू शकता किंवा फक्त दोन तासांसाठी अर्धवेळही नोंदणी करू शकता. पण एक गोष्ट नक्की तुम्ही जे शिकणार, ते जीवन बदलणारे असेल.
शाळेची वैशिष्ट्ये
प्रत्येक वर्गात फक्त 6 ते 16 विद्यार्थी असतात. यात 10 ते 15 वयोगटातील मुले भाग घेतात. इथे इंग्रजी, गणित आणि विज्ञान यासारखे विषय शिकवले जातात, पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्व दिलं जातं मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि त्यांची समस्यांवर विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी. इथे ‘प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’ नावाचा एक स्वतंत्र अभ्यासक्रमही आहे, ज्यात मुलं केवळ उत्तरं शोधत नाहीत तर नवे प्रश्न विचारायला शिकतात.
अॅस्ट्रा नोव्हा शाळेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक टर्मचा अभ्यासक्रम वेगळ्या पद्धतीने तयार केला जातो. प्रत्येक सत्रात नवीन संकल्पना, नव्या समस्या आणि नवीन प्रकल्प दिले जातात, ज्यामुळे मुलांचं विचारविश्व सतत विस्तारत राहतं. वर्गांची किमान वेळ 2 तास आणि कमाल 16 तास असते. प्रवेशासाठी astranova.org ही त्यांची अधिकृत वेबसाइट आहे.
इतकी महाग फी ऐकून अनेकांना हा एक फक्त श्रीमंत मुलांसाठीचा फॅन्सी उपक्रम वाटेल. पण अॅस्ट्रा नोव्हा मागे जी विचारसरणी आहे, ती आहे शिक्षण हे एका संधीसारखं, जे केवळ पुस्तकी ज्ञान न देता जगाचा दृष्टीकोन देतं. ही शाळा दाखवते की भविष्यातील शिक्षण कसं दिसू शकतं. अधिक वैयक्तिक, अधिक कल्पक, आणि अधिक अर्थपूर्ण.