दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाऐवजी मोबाईल वापरण्याकडे वाढलाय कल, पालकांमध्ये चिंतेच वातावरण

Published on -

सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला असला, तरी त्याचा अतिरेक विशेषतः शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करताना दिसत आहे. विशेषतः इयत्ता दहावी व बारावीचे शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अत्यंत निर्णायक ठरते. या काळात अभ्यासाकडे लक्ष देण्याऐवजी विद्यार्थ्यांचा मोबाईलमध्ये अधिक वेळ घालवण्याकडे कल वाढलेला असून, त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल असणे हे काळानुसार आवश्यक असले, तरी त्याच्या वापरावर मर्यादा असणे गरजेचे आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडे व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यांसारखी समाजमाध्यमे असलेले मोबाईल असून, त्यावर त्यांनी स्वतःची खासगी खाती उघडलेली असतात. लहान वयातच मोबाईलचा अतिवापर सुरू झाल्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचे व्यसन लागल्याचे दिसून येते.

गरजेपुरता मोबाईल वापरणे समजू शकते, पण तासनतास मोबाईलमध्ये गुंतून राहिल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. घरी किंवा इतरत्र या वयातील मुले व मुली मोबाईलमध्ये पूर्णतः रमलेली दिसतात. अभ्यासाऐवजी मोबाईलवर वेळ घालवण्यामुळे शैक्षणिक गती मंदावते आणि त्याचा परिणाम वार्षिक परीक्षेतील कामगिरीवर होतो.

मोबाईलचा वापर रात्री अपरात्री चॅटिंगसाठी होतो. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्वतःच्या मित्रमैत्रिणींशी समाजमाध्यमांवर संवाद साधताना दिसतात. याचा त्यांच्या मानसिकतेवर व जीवनशैलीवर दुष्परिणाम होतो. काही वेळा यातून गंभीर व समाजविघातक प्रकारही घडतात. अशा घटनांचा विचार करता, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त गरजेपुरता मर्यादित ठेवावा, हे अत्यावश्यक आहे. उरलेला वेळ अभ्यासासाठी वापरल्यास यशस्वी भवितव्यासाठी ते अधिक फायदेशीर ठरेल.

आज अनेक पालकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे की, दहावीच्या विद्यार्थ्यांना फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट सारख्या चॅटिंग अॅप्सचा वापर करणे कितपत आवश्यक आहे ? मोबाईलवरील व्यर्थ गुंतवणूक आणि मनोरंजनाचे आकर्षण हे शैक्षणिक प्रगतीत अडथळा ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी आणि आरोग्यासाठी पालकांनी अधिक सजग होणे, हे काळाची गरज ठरते.

पालकांनी जागरूक राहावे

या परिस्थितीत पालकांनी जागरूक राहून आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मोबाईलचा मर्यादित वापर, वेळेचे योग्य नियोजन, आणि शाळेतील अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. पालकांनी केवळ कामापुरता मोबाईल देणे, त्यावरील अॅप्सवर नियंत्रण ठेवणे आणि वेळोवेळी संवाद साधणे यामुळे परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते.

आरोग्यावर गंभीर परिणाम

मोबाईलमध्ये व्यर्थ वेळ घालवण्यामुळे केवळ शैक्षणिक नुकसान होत नाही, तर आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात. डोळ्यांची जळजळ, सतत डोकेदुखी, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव यासारखे त्रास निर्माण होतात. काही विद्यार्थी मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत. त्यांच्यात सतत मोबाईल हातात घेण्याची सवय बनते, जी नंतर व्यसनात परिवर्तित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!