नगर-मनमाड महामार्गाच्या ७५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे तात्काळ काम सुरू करावे या मागणीसाठी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या खासदार नीलेश लंके यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी जिल्हाभरातून पाठिंबा मिळत आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका खा. लंके यांनी घेतल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू असून या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
नगर-मनमाड रस्त्याच्या कामासाठी खा. नीलेश लंके हे गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. खा. लंके यांनी यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर या कामाची पुन्हा निविदा प्रसिध्द होऊन एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष कार्यारंभ आदेशही देण्यात आला. मात्र दोन महिने उलटूनही हे काम सुरू न झाल्याने खा. लंके यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. लंके यांनी निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याने शुक्रवार दि.११ जुलै पासून खा. लंके यांनी बेमुदत उपोषण सुरू केले.

शनिवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राहुरी, राहता, कोपरगांव येथील विविध गावांचे सरपंच तसेच इतर पदाधिकारी, शिर्डी येथील पदाधिकारी तसेच व्यापारी यांनी आंदोलनस्थळी भेट देत खा. लंके यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बाधित झालेल्या गावांव्यतीरिक्त जिल्ह्याच्या इतर भागांमधील नागरिक, पदाधिकारीही आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा देत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नगर शहरातील व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगर शहरात वास्तव्यास असलेले शासकीय कर्मचारी यांच्यासह अनेक नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठींबा व्यक्त करत होते. त्यानंतर पहाटे उशिरा खा. लंके यांनी आंदोलनासाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विश्रांती घेतली. आंदोलस्थळी दिवसा तसेच रात्रीही पोलीसांचा चोख बंदोबस्त होता.
अधिकारी, ठेकेदाराकडून मनधरणी
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, कार्यकारी अभियंता प्रशांत बेरड तसेच या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने खा. लंके यांची भेट घेऊन काम सुरू करतो आंदोलन मागे घेण्यासाठी मनधरणी केली, मात्र खा. लंके यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत ७५ किलोमीटर अंतराचे काम असताना, कार्यारंभ आदेश मिळून दोन महिने उलटली तरी काम करण्यासाठी तुमची काय तयारी झाली आहे ? किती यांत्रीक उपकरणे आहेत ? याची ठेकेदाराकडे विचारणा केली, त्यावर ठेकेदार निरूत्तर झाला.
खा. भाऊसाहेब वाघचौरे यांचा पाठिंबा
दरम्यान, खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी खा. नीलेश लंके यांच्याशी संपर्क करून या प्रश्नावर मी तुमच्यासोबत आहे, दिल्लीतील महत्वपुर्ण बैठकीमुळे आपण दिल्लीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितल्याचे खा. लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, खा. वाघचौरे यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिल्याचेही लंके यांनी सांगितले.