जपानच्या इंटरनेट स्पीडने इतिहास घडवला! 1 सेकंदात तब्बल 10 लाख GB डेटा, सेकंदात नेटफ्लिक्सची अख्खी लायब्ररी डाउनलोड

Published on -

जगभरात इंटरनेटच्या गतीचा झपाट्याने वाढत असलेला प्रवास एक नवे वळण घेत आहे आणि यावेळी या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे जपान. तिथल्या शास्त्रज्ञांनी असा काही पराक्रम करून दाखवला की जगभरातील तंत्रज्ञानप्रेमी थक्क झाले आहेत. एका सेकंदात 10 लाख जीबी डेटा ट्रान्सफर करण्याचा विक्रम जपानी संशोधकांनी नोंदवला आहे. हे यश केवळ आकड्यांपुरते मर्यादित नाही, तर डिजिटल विश्वाचा संपूर्ण चेहरामोहराच बदलवणारे आहे.

जपानचा नवा रेकोर्ड

जपानच्या राष्ट्रीय माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान संस्थेने म्हणजेच NICT ने हे यश मिळवलं. त्यांच्या प्रयोगशाळेत, एका सेकंदात तब्बल 1.02 पेटाबाइट्स म्हणजे जवळपास 10 लाख जीबी एवढ्या प्रमाणात माहिती ट्रान्सफर करण्यात आली. ही गती इतकी अफाट आहे की आज तुम्ही नेटफ्लिक्सवरील संपूर्ण लायब्ररी किंवा 150 जीबीपेक्षा मोठे गेम्स एका क्षणात डाउनलोड करू शकता. ही केवळ एक तांत्रिक भरारी नाही, तर आपल्या जीवनशैलीत क्रांती घडवणारी गोष्ट आहे.

या वेगाची तुलना भारताशी केली, तर चित्र आणखीच प्रभावी ठरतं. सध्या भारतात सरासरी इंटरनेट स्पीड 63.55 Mbps आहे, आणि त्याच्या तुलनेत जपानचा वेग जवळपास 1.6 कोटी पट अधिक आहे. अमेरिकेसारख्या तांत्रिक प्रगत देशापेक्षा देखील हा वेग 3.5 पट जास्त आहे. या प्रगतीचा अर्थ असा की, हजारो 4K चित्रपट देखील एका सेकंदात सहज डाउनलोड करता येतील. हे ऐकूनच रोमांच येतो, नाही का?

फायदे काय होणार?

पण इतकं सगळं शक्य झालं तरी कसं? यामागे आहे अत्याधुनिक फायबर ऑप्टिक तंत्रज्ञान आणि मल्टी-कोर फायबर प्रणाली, जी सध्या घरांमध्ये असलेल्या सामान्य नेटवर्कपेक्षा सुमारे 1 लाख पट वेगवान आहे. या प्रगत सिग्नल प्रोसेसिंग प्रणालीमुळे इंटरनेटमधील अडथळे जवळपास नामशेष झाले आहेत. यामुळे भविष्याच्या दारात उभं असलेलं जग आता अधिक स्पष्ट आणि वेगवान वाटायला लागतं.

या तांत्रिक क्रांतीचा उपयोग केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही. वैद्यकीय क्षेत्रात याचा जबरदस्त परिणाम दिसून येईल. एखाद्या गंभीर आजारग्रस्त रुग्णासाठी रिअल टाइममध्ये डेटा शेअर करणे, दूर असलेल्या डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करणे, या गोष्टी आता शक्य होतील. त्याचप्रमाणे, स्मार्ट सिटी, AI, आणि IOT सारख्या अत्याधुनिक गोष्टींना नवे आयाम मिळतील. पायाभूत सुविधा अधिक स्मार्ट होतील, आणि सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थाही अधिक प्रभावी बनू शकते.

भारतातील स्थिती

पण या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताचे वास्तव थोडं वेगळं आहे. देशातील ग्रामीण भागात अजूनही इंटरनेट मर्यादित स्वरूपात पोहोचले आहे. एकीकडे जपान 6G उपकरणांच्या चाचण्या करत आहे, तर दुसरीकडे भारतात 5G नुकतंच रुजायला लागलं आहे. विशेषतः महिलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण जरी वाढले असले तरी त्यापैकी अनेकांकडे स्वतःचा फोनही नाही. ही दरी केवळ तांत्रिकच नाही, तर सामाजिकही आहे.

जपानने यावर्षी 6G उपकरणाचे देखील प्रात्यक्षिक सादर केले, ज्यात 100 Gbps चा वेग आणि 300 फूटांपर्यंत कव्हरेज असल्याचे नमूद करण्यात आले. हे लक्षात घेतल्यास, तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत जपान किती पुढे आहे हे स्पष्टपणे दिसून येते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!