भारताच्या संरक्षण क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झाले आहे. एक असं युग जिथे आपली देशी बनावटीची शस्त्रं आता जागतिक दर्जाच्या आणि युद्धात निर्णायक ठरणाऱ्या ठरत आहेत. अशाच आत्मनिर्भर भारताच्या यशस्वी पावलांपैकी एक म्हणजे ‘अस्त्र’ एक शक्तिशाली आणि स्वदेशी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, जे केवळ तांत्रिक प्रगतीच नाही, तर शौर्य, विश्वास आणि स्वावलंबनाचे प्रतीकही बनले आहे.
‘अस्त्र’ मिसाईल

DRDO आणि भारतीय हवाई दलाने संयुक्तपणे विकसित केलेले ‘अस्त्र’ क्षेपणास्त्र सध्या देशाच्या लढाऊ क्षमतेचा आधारस्तंभ ठरत आहे. हे केवळ 100 किलोमीटर पेक्षा जास्त पल्ल्याचे क्षेपणास्त्र नाही, तर त्यात ‘बीयॉन्ड व्हिज्युअल रेंज’ म्हणजेच दृश्यापलीकडून मारा करण्याची ताकद आहे. या आधुनिक क्षेपणास्त्राची चाचणी सुखोई-30 MKI लढाऊ विमानातून करण्यात आली आणि या चाचणीत त्याने प्रचंड अचूकतेने आपले लक्ष्य भेदले. ओडिशाच्या किनाऱ्यावर घेण्यात आलेल्या या चाचणीत दोन्ही वेळा ‘अस्त्र’ने दुश्मनाचे लक्ष्य खेचून तंतोतंत उध्वस्त केल्याने याच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले.
या क्षेपणास्त्रातील सर्वात मोठा गेमचेंजर ठरतो तो म्हणजे याचा ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर’. हे सीकर आणि मार्गदर्शन यंत्रणा पूर्णतः भारतात विकसित केली गेली आहे. याचा अर्थ असा की या क्षेपणास्त्राच्या मुख्य तंत्रज्ञानावर भारताचा पूर्ण हक्क आणि नियंत्रण आहे. हवाई युद्धामध्ये हे फारच महत्त्वाचे मानले जाते, कारण या तंत्रज्ञानामुळे भारताने परकीय अवलंबित्वाच्या बाहेर पडून स्वयंपूर्णतेकडे मोठी झेप घेतली आहे.
‘अस्त्र’ची ताकद
‘अस्त्र’ची ताकद इतकी आहे की, ही प्रणाली केवळ सुखोई-30 MKI मध्येच नाही, तर भविष्यातील तेजस MK-2, राफेल यांसारख्या विमानांमध्येही समाविष्ट केली जाणार आहे. यातून भारताच्या संपूर्ण हवाई ताफ्यात एक नवे धारधार अस्त्र सामील होत आहे. केवळ अस्त्रच नव्हे, तर DRDO आता याच्या आणखी प्रगत आवृत्त्यांवरही काम करत आहे ‘अस्त्र MK-II’ आणि ‘अस्त्र MK-III’, ज्याला ‘गांडिव’ असे गौरवपूर्ण नाव देण्यात आले आहे. या नावामागे महाभारतातील अर्जुनाच्या पराक्रमी धनुष्याची प्रेरणा आहे, ज्याने दुर्योधनाचे सैन्य उध्वस्त केले.
‘गांडिव’ क्षेपणास्त्र
‘गांडिव’ क्षेपणास्त्राची मारक क्षमता थक्क करणारी आहे. जेव्हा एखादे लक्ष्य 20 किलोमीटर उंचीवर असते, तेव्हा हे क्षेपणास्त्र तब्बल 340 किलोमीटर अंतरावरून शत्रूवर अचूक हल्ला करू शकते. जर तेच लक्ष्य 8 किलोमीटरपेक्षा कमी उंचीवर असेल, तरीही हे क्षेपणास्त्र 190 किलोमीटर अंतरापर्यंत कार्यक्षम राहते. ही क्षमता सध्याच्या कोणत्याही विदेशी क्षेपणास्त्राशी सहज स्पर्धा करू शकते. विशेषतः चीनच्या PL-15 क्षेपणास्त्रालाही हे मागे टाकेल, असा विश्लेषकांचा विश्वास आहे.
आजवर भारतीय हवाई दलाच्या राफेलमध्ये फ्रेंच बनावटीचं ‘मेटेओर’ क्षेपणास्त्र होतं, ज्याची श्रेणी 200 किलोमीटर पर्यंत आहे. पण ‘गांडिव’ने ही मर्यादा पार करत नव्या युगाची सुरुवात केली आहे. भारताच्या हवाई क्षेत्रात आता केवळ हल्ल्याचा नव्हे, तर तंत्रज्ञानाचा संपूर्ण ताबा आहे. या क्षेपणास्त्राची तैनाती झाल्यानंतर भारताला कोणत्याही प्रकारच्या हवाई आक्रमणाचा सामना अधिक आत्मविश्वासाने करता येईल.