श्रावण महिना आला की वातावरणात भक्तिभावाचे रंग मिसळायला लागतात. मंदिरांमध्ये बेलफुलांचा सुगंध दरवळतो, ओढ्यांतून कावड घेऊन चालणाऱ्या शिवभक्तांची पावले उमटतात, आणि सोळा सोमवारांचे व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या मनात शिवभक्तीची गूढ शांतता भिनलेली असते. पण या सगळ्या धार्मिक उत्साहात एक प्रश्न अनेक महिलांच्या मनात सतत घोळत असतो. मासिक पाळीच्या काळात शिवपूजा करता येते का? श्रावणच्या व्रतामध्ये अशा वेळी आपल्याला काय करावे, काय टाळावे, हे समजून घ्यायला हवे.

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात महिन्यातून एकदा येते. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे ही प्रक्रिया घडते आणि त्यामुळे स्त्रियांना काही प्रमाणात शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता भासते. पण आपल्या समाजात, आजही अनेक ठिकाणी मासिक पाळीला अशुद्धतेची भावना जोडली गेलेली आहे. त्यामुळे पाळीच्या काळात पूजा, मंदिर प्रवेश, किंवा धार्मिक कार्यांपासून दूर राहण्याचा आग्रह केला जातो. काही स्त्रिया या काळात शिवाच्या व्रतांपासून दूर राहतात, तर काहीजणी मनात अपराधी भावना घेऊन मंदिराच्या पायरीवरही जाण्याचं धाडस करत नाहीत.
काय म्हणाले प्रेमानंद महाराज?
या पार्श्वभूमीवर वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांनी दिलेले मार्गदर्शन खरंच मनाला शांती देणारे आहे. एका महिलेनं विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, मासिक पाळी ही कोणतंही पाप किंवा घाण नव्हे. ती एक जीवनाच्या निर्मितीशी निगडित असलेली पवित्र प्रक्रिया आहे. जर एखादी स्त्री मासिक पाळीच्या काळातही श्रद्धेने व्रत करत असेल, मंदिरात पोहोचत असेल, तर केवळ त्या कारणामुळे तिला दर्शनापासून वंचित ठेवणं अन्यायकारक आहे.
प्रेमानंद महाराज स्पष्ट सांगतात की, जरी स्त्रियांना यावेळी मंदिरात प्रवेश करताना देवाच्या मूर्तीला स्पर्श करणं वा कोणत्याही सेवा-पूजेत थेट सहभागी होणं टाळावं लागेल, तरीही मनातल्या भक्तीवर कुठलीही मर्यादा नाही. त्यांनी केवळ अंतर राखून, मनातून प्रार्थना करावी आणि ईश्वराच्या दर्शनाचा अनुभव घ्यावा. ही भावना जास्त महत्त्वाची आहे, कारण ईश्वर हृदयात असतो, आणि भक्ती मनातून केली जाते.
“…तर हा भक्तीचा अपमान होतो”
ते असंही सांगतात की, खूप कष्ट करून, वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून, जर एखादी महिला मंदिरात पोहोचते आणि केवळ मासिक पाळीमुळे तिला दर्शन नाकारलं जातं, तर त्या भक्तीचा अपमान होतो. त्यामुळे समाजाने या संकल्पनांकडे अधिक सहानुभूतीने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला हवं.
अर्थातच, धार्मिक विधींचे काही नियम असतात आणि ते पाळले पाहिजेत, पण त्याचवेळी भावना आणि श्रद्धेचा सन्मान करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. मासिक पाळीबाबत समाजात जी चुकीची समज आहे की ती अशुद्धतेची, अपराधीपणाची, लज्जेची ती दूर करण्याची हीच वेळ आहे. प्रेमानंद महाराज यांनी स्पष्ट केलं आहे की मासिक पाळी ही महिलांच्या शरीरातील एक शक्ती आहे, ज्याचा आपण आदर करायला हवा.