जर तुम्हीही नीट किंवा आयआयटी परीक्षेत अपयशी ठरलात आणि वाटू लागलं की तुमचं करिअर अंधारात गेलं, तर थांबा. ही निराशा तुमच्या क्षमतेवर अन्याय करू शकते. आजचा काळ हा केवळ डिग्रीवर चालणारा नाही, तर कौशल्य, कल्पकता आणि समजूतदार दृष्टिकोन असलेल्यांचा आहे. डॉक्टर किंवा इंजिनिअर होणं म्हणजेच यश असं समीकरण आता मागे पडलं आहे. अनेक तरुण नव्या वाटा स्वीकारून, पारंपरिक वाटा सोडून, लाखो रुपयांचे उत्पन्न कमावत आहेत. चला पाहूया अशाच काही टॉप करिअरच्या संधी, ज्या तुम्हालाही एक यशस्वी आणि समाधानी जीवन देऊ शकतात.
यूआय डिझाईन

सर्वप्रथम बोलायला हवं यूएक्स आणि यूआय डिझाईन या क्षेत्राबद्दल. तुम्ही जेव्हा एखादं अॅप किंवा वेबसाईट वापरता, तेव्हा त्याचं किती सोपं आणि सुंदर दिसणं तुम्हाला त्यात गुंतवून ठेवतं. हे काम करत असतात यूजर एक्सपीरियन्स आणि यूजर इंटरफेस डिझायनर. यामध्ये तुम्ही कोणत्याही पारंपरिक डिग्रीशिवायही गुगल यूएक्स सर्टिफिकेटसारखे कोर्स करून सुरुवात करू शकता. सुरुवातीला 6 ते 10 लाखांचा पगार मिळतो आणि अनुभव वाढल्यावर तो सहज 20 ते 25 लाखांपर्यंत पोहोचतो.
डिजिटल मार्केटिंग
दुसरं करिअर आहे डिजिटल मार्केटिंग. तुम्हाला सोशल मीडियाचा, जाहिरातींचा, लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा शौक असेल, तर हे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. आज अगदी राजकीय पक्षांपासून ते छोट्या स्टार्टअप्सपर्यंत प्रत्येकाला डिजिटल मार्केटिंगची गरज आहे. एसईओ, कंटेंट स्ट्रॅटेजी, सोशल मीडिया मॅनेजमेंट अशा गोष्टी शिकून तुम्ही 5 ते 8 लाखांच्या सुरुवातीच्या पगारासह या क्षेत्रात प्रवेश करू शकता. काही वर्षातच तो पगार 20 लाखांपर्यंत पोहोचतो.
एथिकल हॅकिंग आणि सायबर सिक्युरिटी
एथिकल हॅकिंग आणि सायबर सिक्युरिटी हे क्षेत्र आजच्या डिजिटल युगात अत्यंत गरजेचं बनलं आहे. कंपन्या आता त्यांच्या डेटाचे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षित हॅकर्स नियुक्त करतात, जे त्यांच्या सिस्टिममधील त्रुटी शोधून काढतात. बीसीए, एमसीए किंवा तत्सम कोर्स करून तुम्ही हे ज्ञान मिळवू शकता. सुरुवातीला 8 ते 10 लाखांचा पगार मिळतो आणि अनुभव घेतल्यावर तो 30 लाखांपर्यंत जाऊ शकतो.
अॅनिमेशन आणि गेम डिझाइन
तुम्ही जर थोडं कलात्मक विचार करणारे असाल, तर अॅनिमेशन आणि गेम डिझाइनसारखं क्षेत्र तुमच्यासाठी आदर्श ठरू शकतं. ओटीटी प्लॅटफॉर्म्स, व्हिडिओ गेम्स आणि आभासी वास्तव या गोष्टींच्या मागणीमुळे या उद्योगाने झपाट्याने भरारी घेतली आहे. सुरुवातीला 4 ते 8 लाख मिळतात, पण एकदा चांगला पोर्टफोलिओ तयार झाला की तुम्ही 15 लाखांहून अधिकही कमवू शकता.
मानसशास्त्र
आणखी एक महत्वाचं आणि आजच्या समाजासाठी अत्यावश्यक ठरतंय ते म्हणजे मानसशास्त्र आणि मानसिक आरोग्याचं क्षेत्र. मानसिक तणाव वाढत असताना, समुपदेशनाची गरजही तितकीच वाढते आहे. बीए किंवा एमए मानसशास्त्रानंतर डिप्लोमा करून तुम्ही थेरपीस्ट बनू शकता. या क्षेत्रात सुरुवातीला 4 ते 6 लाखांचं उत्पन्न मिळतं, आणि अनुभव वाढला की 15 ते 20 लाखांचा पगारदेखील शक्य होतो.