नेटफ्लिक्ससारखा ओटीटी प्लॅटफॉर्म आज जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा भाग बनला आहे. दर आठवड्याला नव्या वेब सिरीज, डॉक्युमेंटरीज आणि चित्रपटांची रेलचेल असते. काही कंटेंट प्रेक्षकांच्या मनाला भिडतात, काही विसरले जातात, तर काही इतके धक्कादायक असतात की ते वादाचं केंद्रबिंदू बनतात. आज आपण अशाच नेटफ्लिक्सवरील 7 चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या विषय, मांडणी आणि कलात्मक दृष्टिकोनामुळे प्रेक्षकांमध्ये संताप आणि आश्चर्याचं वादळ निर्माण केलं.
‘Cuties’
2020 मध्ये प्रदर्शित झालेला ‘Cuties’ हा फ्रेंच चित्रपट लहान मुलींच्या नृत्य समूहावर आधारित होता. पण चित्रपटाचं प्रमोशनल पोस्टर इतकं वादग्रस्त ठरलं की नेटफ्लिक्सवर अक्षरशः टीकेचा भडिमार झाला. अनेकांनी असा आरोप केला की, या चित्रपटाने अल्पवयीन मुलींना लैंगिक स्वरूपात सादर केलं. नेटफ्लिक्सने नंतर माफी मागून स्पष्ट केलं की चित्रपटाचा हेतू मुलींच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवण्याचाच होता. पण तोपर्यंत वाद पेटला होता.

‘The First Temptation of Christ’
त्याच वर्षी, एक दुसरा चित्रपट ‘The First Temptation of Christ’ यामुळे ख्रिश्चन समुदायात संताप उसळला. येशू ख्रिस्ताला समलैंगिक म्हणून सादर केल्यामुळे अनेकांना हे धर्मद्रोही वाटलं. खरेतर, हा चित्रपट एक सॅटायर म्हणजेच विनोदी टीका होती, पण धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि देशोदेशी आंदोलने झाली.
‘The Platform’
‘The Platform’ या स्पॅनिश चित्रपटाची संकल्पना अनोखी असली तरी, त्यामधील अमानवी दृश्यं, नरभक्षण आणि अमर्याद नैतिक भ्रष्टतेमुळे हा चित्रपट बरेचसे लोक सहन करू शकले नाहीत. तुरुंगामधील भयानक स्थिती आणि समाजव्यवस्थेवरचा हा प्रतिकात्मक प्रहार अनेकांच्या जिव्हारी लागला.
‘365 Days’
प्रेमकथेच्या नावाखाली वाद निर्माण करणारा चित्रपट म्हणजे ‘365 Days’. एका व्यक्तीने एका स्त्रीचं अपहरण केलं आणि तिला प्रेमात पडण्यासाठी 365 दिवसांचा कालावधी दिला अशी मुख्य कथा होती. अनेकांनी याला बलात्काराचा प्रचार आणि स्टॉकहोम सिंड्रोमला ग्लोरिफाय केल्याचा आरोप केला. स्त्री हक्क कार्यकर्त्यांनी या चित्रपटाविरोधात आवाज उठवला.
‘The Devil All the Time’
‘The Devil All the Time’ या चित्रपटात धर्म, लैंगिक शोषण आणि हिंसेचा उग्र व गुंतागुंतीचा प्रवास आहे. हा गडद थ्रिलर काही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला, तर काहींना तो इतका त्रासदायक वाटला की त्यांनी धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला.
‘Blonde’
‘Blonde’, मर्लिन मनरोच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट, तिच्या आयुष्यातील दुःखद घटनांना काल्पनिक स्वरूप देत सादर करण्यात आला. गर्भपात, मानसिक हिंसा आणि महिलांच्या शरीराला भोगवस्तू म्हणून दाखवलं गेल्यामुळे यावरही जोरदार वाद झाला.
‘Da 5 Bloods’
शेवटी ‘Da 5 Bloods’ या चित्रपटानेहि वाद निर्माण केला होता. काही लोकांनी या चित्रपटावर गोष्टींचं चुकीचं चित्रण आणि तथ्यांशी खेळ केल्याचा आरोप लावला. काहींसाठी हा युद्धपट भावला, तर काहींसाठी तो एका विशिष्ट राजकीय विचारधारेचा प्रचार होता.