पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! येवलेवाडी ते कोंढवा दरम्यान नवीन मेट्रो मार्ग विकसित होणार ? सरकारची भूमिका काय ?

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या एका सदस्याकडून पुणे मेट्रोचा विस्तार येवलेवाडी ते कोंढवा पर्यंत करा अशी आग्रही मागणी उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण याच संदर्भातील डिटेल माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Pune Metro News : महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाचे ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून या मेट्रो मार्गांचे महा मेट्रो कडून संचालन केले जात आहे.

दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भाग आणि आयटी हब म्हणून ख्यातनाम असणाऱ्या हिंजवडी दरम्यानही मेट्रो मार्ग विकसित केला जात असून या मार्गाचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे.

हा पुण्यातील पहिलाच पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावरील मेट्रोमार्ग असून या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे आणि येत्या काही महिन्यांनी हा मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

याशिवाय महा मेट्रो कडून सुरु करण्यात आलेल्या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण देखील केले जात आहे. दरम्यान आता पुण्यात नव्या मेट्रो मार्गाचीही मागणी केली जात आहे.

येवलेवाडी – कोंढवा पर्यंत मेट्रो सुरू करण्याची मागणी 

एकीकडे पुणे शहरात वेगवेगळ्या मेट्रो मार्गांचे काम सुरू असतानाच आता महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य योगेश टिळेकर यांनी पुणेरी मेट्रोचा प्रस्तावित मार्ग येवलेवाडी-कोंढवा पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.

या भागातील वाढती लोकसंख्या पाहता या भागातही मेट्रो सुरु होण्याची गरज आहे आणि म्हणूनच योगेश टिळेकर यांनी येवलेवाडी ते कोंढवा पर्यंत मेट्रो मार्ग तयार करण्याची मागणी केली आहे.

दक्षिण पुणे उपनगरांना शहराच्या विस्तारत्या मेट्रो नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्याची गरज असल्याचे सांगून योगेश टिळेकर यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ही मागणी उपस्थित केली आहे.

शिवाजीनगर मेट्रो मार्ग हा येवलेवाडी-कोंढवा पर्यंत वाढवा आणि कात्रज-हडपसर मेट्रो कॉरिडॉरचे काम सुरू करा अशी आग्रही मागणी टिळेकर यांनी उपस्थित केली असून या मागणीवर राज्य सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

धर्मवीर किल्ल्यावर संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे 

आमदार योगेश टिळेकर यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील धर्मवीर किल्ल्यावर स्वराज्याचे धाकले छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचे भव्य स्मारक विकसित करण्याचीही मागणी यावेळी उपस्थित केली आहे. दरम्यान स्मारक बांधण्याच्या मागणीवर फडणवीस सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी स्मारकाच्या प्रस्तावावर लवकरच विचार केला जाईल असे आश्वासन सभागृहाला दिले असून यामुळे शिवशंभू भक्तांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!