8.20% व्याज आणि करसूटही! ‘या’ 5 सरकारी योजना देतील लाखो रुपयांचं उत्पन्न, जाणून घ्या सविस्तर

Published on -

तुमच्याकडे काही पैसे बचत करून ठेवले आहेत, पण त्यांचं पुढं काय करायचं याचा निर्णय घेता येत नाहीये का? एकीकडे भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक हवी आणि दुसरीकडे आयकरही वाचवायचा आहे, हीच अवस्था सध्या अनेक कुटुंबांची आहे. विशेषतः मध्यमवर्गीयांसाठी, गुंतवणूक म्हणजे फक्त पैसे वाढवण्याचं साधन नाही, तर ती भविष्यातील स्थैर्य आणि सन्मानाचं आयुष्य मिळवण्याची एक वाटचाल असते.

आपण या लेखात आज अशा काही सरकारी योजनांविषयी जाणून घेणार आहोत, ज्या केवळ सुरक्षित गुंतवणुकीसाठीच नाही, तर तुमचा कर वाचवण्यासाठीही मदत करतात. आणि विशेष म्हणजे, या योजना 100% सरकारी हमीने सुरक्षित आहेत.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी

सर्वात आधी पाहूया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPF. ही योजना तुम्ही नोकरीला लागल्यानंतर आपसूकच सुरू होते. तुमच्या पगारातून एक ठरावीक टक्का दरमहा वजा होतो आणि तुमचा नियोक्ताही त्यात तितकंच भर घालतो. हा सगळा पैसा तुमच्या निवृत्तीच्या दिवशी तुमच्यासाठी राखून ठेवलेला असतो. या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, इथं जमा केलेली रक्कम 58 वर्षांनंतर पूर्णपणे परत मिळते आणि तीही टॅक्स फ्री. शिवाय, आयुष्यात काही अचानक गरज आली तर या खात्यातून काही रक्कम आंशिक स्वरूपात काढण्याची मुभाही आहे.

‘ज्येष्ठ नागरिक बचत योजना’

तुम्ही जर 60 वर्षांहून अधिक वयाचे असाल, तर पोस्ट ऑफिसच्या ‘ज्येष्ठ नागरिक बचत योजना’सारखी सुरक्षित गुंतवणूक फारच फायदेशीर ठरते. सध्या 8.20% दराने व्याज मिळणारं हे खाते फक्त वयस्कांसाठी आहे. गुंतवलेली रक्कम 5 वर्षांनंतर परत मिळते आणि दर तीन महिन्यांनी खात्यावर व्याज जमा होतं. तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मिळून जर 30 लाख रुपये गुंतवले, तर दर महिन्याला साधारणपणे 41,000 रुपये व्याजरूपात मिळू शकतात. शिवाय, या योजनेवरही कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

 

मध्यमवर्गीयांसाठी आणखी एक लोकप्रिय आणि सरकारी हमीची योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF. यात दरवर्षी 500 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते आणि सध्या यावर 7.1% व्याज मिळत आहे. या योजनेत गुंतवणूक करताना जोखीम नसते आणि हे खाते उघडणंही अतिशय सोपं आहे. 15 वर्षांपर्यंत ही योजना चालते आणि वेळोवेळी वाढवता देखील येते. सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यावरील व्याज आणि मूळ रक्कमही पूर्णपणे टॅक्स फ्री असते.

‘सुकन्या समृद्धी योजना’

तुमचं लक्ष जर आपल्या मुलीच्या भविष्याकडे असेल, तर ‘सुकन्या समृद्धी योजना’ हे एक आश्वासक उत्तर आहे. मुलगी जन्मल्यावर ते ती 10 वर्षांची होईपर्यंत हे खाते उघडता येतं. यातही दरवर्षी किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. सध्या यावर 8.2% इतकं आकर्षक व्याज दिलं जातं. जेव्हा मुलगी 21 वर्षांची होते, तेव्हा पूर्ण रक्कम काढता येते आणि तिच्या शिक्षणासाठी, विवाहासाठी एक मोठा आर्थिक आधार मिळतो.

राष्ट्रीय निवृत्ती योजना

शेवटी, जर तुम्ही तुमचं वृद्धापकाळातलं जीवन सुरळीत आणि नियमित उत्पन्नासह जगायचं ठरवलं असेल, तर राष्ट्रीय निवृत्ती योजना म्हणजेच NPS योग्य पर्याय ठरेल. 18 ते 70 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक हे खाते उघडू शकतो. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळते आणि कलम 80C व्यतिरिक्त 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त करसवलतही घेता येते. तुम्ही कॉर्पोरेट मॉडेलचा पर्याय निवडल्यास, नियोक्ताही तुमच्यासाठी योगदान देतो आणि तुम्हाला थेट करबचतीचा लाभ होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!