आपण साप म्हटलं की अंगावर सरसरून काटा येतो. आणि जर विषय “जगातील सर्वात विषारी साप” असाच असेल, तर अंगावर थरकाप उभा राहणं साहजिकच आहे. काही साप असे असतात की त्यांच्या एका चाव्याने अवघं जीवन क्षणार्धात संपतं. काही साप इतके आक्रमक आणि वेगवान असतात की ते डोळ्यांसमोर दिसायच्या आधीच आपली शिकार करतात. आज आपण अशाच पाच अत्यंत प्राणघातक आणि थरकाप उडवणाऱ्या सापांबद्दल जाणून घेणार आहोत, जे मानवी जीवनासाठी मृत्यूपेक्षाही मोठा धोका ठरतात.

ब्लॅक मांबा
सर्वात आधी बोलूया ब्लॅक मांबा बद्दल. हा आफ्रिकेचा साप इतका धोकादायक आहे की त्याला ‘काळा मृत्यू’ म्हटलं जातं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अतिवेग आणि अचूक हल्ला. 20 किमी/तास या गतीने धावत, तो एका क्षणात समोरच्या माणसावर तुटून पडतो. त्याच्या तोंडाच्या आतील भागाचा काळसर रंग त्याला ‘ब्लॅक मांबा’ हे नाव देतो. एका चाव्याने 100-120 मि.ग्रा विष शरीरात जातं, आणि उपचार वेळेवर न मिळाल्यास माणसाची श्वसनक्रिया थांबते, मज्जासंस्थेला झटका बसतो आणि काही मिनिटांत मृत्यू होतो.
फर-डी-लान्स
मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील फर-डी-लान्स, ज्याला टेरसिओपेलो असंही म्हणतात, हा आणखी एक घातक साप. 4 ते 8 फूट लांब आणि 6 किलोपर्यंत वजन असलेला हा साप विशेषतः गवताळ आणि नदीकाठच्या भागात आढळतो. त्याच्या विषामुळे रक्त गोठतं, चावलेली जागा काळसर पडते आणि ऊती नष्ट होतात. विशेष म्हणजे, या जातीची मादी एकावेळी तब्बल 90 बाळांना जन्म देते त्यामुळे त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते, आणि त्यामुळे त्यांचा धोका अधिक वाढतो.
बूमस्लँग
दक्षिण आफ्रिकेत झाडांमध्ये राहणारा बूमस्लँग नावाचा हिरवा साप प्रथमदर्शनी सौम्य वाटतो, पण त्याचं विष हळूहळू शरीराची आतून वाताहत करतं. जर त्याने चावलं, तर शरीरात रक्तस्त्राव होतो. ही प्रक्रिया 24 तासात सुरुवात होते. या सापाची शिकार करण्याची पद्धतही अनोखी आहे. झाडावर फांदीसारखा स्थिर राहून तो अचानक हल्ला करतो. योग्य वेळी उपचार मिळाला नाही, तर मृत्यू जवळ येतोच.
ईस्टर्न टायगर स्नेक
ऑस्ट्रेलियातील ईस्टर्न टायगर स्नेक देखील नावासारखाच भयंकर आहे. त्याच्या शरीरावरील काळे-पिवळे पट्टे त्याला वाघासारखा भास देतात, पण त्याचं विष या सौंदर्याच्या पार गेला आहे. चाव्यानंतर 15 मिनिटांतच मृत्यू होण्याची शक्यता असते. ऑस्ट्रेलियात दरवर्षी सरासरी एक व्यक्ती त्याच्या चाव्याने मृत्यूमुखी पडते. या सापाचा परिसर पर्वतरांगा आणि गवताळ भाग असतो, जिथे तो सहज लपून राहू शकतो.
रसेल वायपर
आणि शेवटी, भारतातल्या ग्रामीण भागातील मृत्यूचा एक प्रमुख स्रोत म्हणजे रसेल वायपर, ज्याला ‘दाबोइया’ असंही म्हणतात. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये आढळणाऱ्या या सापामुळे भारतात दरवर्षी सुमारे 58,000 लोकांचा मृत्यू होतो. त्याचे विष शरीरात झपाट्याने परिणाम करतं. किडनी निकामी होते, रक्तस्त्राव सुरू होतो आणि अंगातील अवयव झपाट्याने निष्क्रिय होतात. तो विशेषतः रात्री सक्रिय असतो आणि शेतात लपून बसतो. त्याच्या फुसफुसण्याचा आवाज आणि आक्रमक वर्तन हे त्याच्या भयानकतेचे निदर्शक आहेत.