बँकेत लॉकर घेणं म्हणजे आपल्या मौल्यवान वस्तूंना एक सुरक्षित छत मिळणं. दागिने असोत, महत्त्वाची कागदपत्रं असोत किंवा एखादी जपून ठेवलेली आठवण, घरापेक्षा बँकेत ती अधिक सुरक्षित वाटते. पण ‘लॉकर’ या संकल्पनेभोवती अनेक प्रश्न आणि गैरसमज फिरत असतात. चोरी झाली, पूर आला, नुकसान झालं अशा वेळी बँक काय करेल? कोण जबाबदार असेल? याची ठोस माहिती अनेकांना नसते. म्हणूनच, लॉकरच्या मागच्या या सगळ्या नियमांच्या गोष्टी आज नीट समजून घेऊया.

बँकेच्या लॉकरची सुविधा ही कोणालाही सहज मिळत नाही. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, केवळ ज्यांचं त्या बँकेत बचत किंवा चालू खाते आहे, त्यांनाच लॉकर मिळतो. आणि लॉकरसाठी तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा अशी कागदपत्रं द्यावी लागतात. काही बँका लॉकर देताना फिक्स्ड डिपॉझिटची अट घालतात, पण ती रक्कम तुमच्या लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या तीनपटांपेक्षा जास्त असू शकत नाही.
लॉकर मिळाल्यावर त्यासाठी एक लेखी करार करावा लागतो. लॉकरच्या गरजेनुसार त्याचा आकार निवडता येतो आणि बँक त्यासाठी विशिष्ट क्रमांकाची चावी ग्राहकाला देते. लॉकरची मास्टर चावी मात्र बँकेकडेच राहते. ही संपूर्ण सेवा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर चालते, म्हणजेच प्रतीक्षा यादीत नाव असेल, तर पुढचा नंबर लागेपर्यंत थांबावं लागतं.
लॉकरमध्ये काय ठेवता येतं?
आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लॉकरमध्ये काय ठेवता येतं आणि काय नाही? दागिने, रत्ने, महत्त्वाची कागदपत्रं इत्यादी सहज ठेवता येतात. पण रोख रक्कम, शस्त्रास्त्रं, स्फोटकं, ड्रग्स किंवा कोणतंही बेकायदेशीर साहित्य ठेवणं कडक निषिद्ध आहे. जर एखादी वस्तू इतर ग्राहकांना किंवा बँकेला धोका निर्माण करू शकते, तर तीही लॉकरमध्ये ठेवता येणार नाही.
वस्तु चोरीला गेल्यास भरपाई मिळते?
आता येतो खरी काळजी वाटणारा मुद्दा, लॉकरमधील वस्तू चोरीला गेल्या किंवा नुकसान झालं तर जबाबदारी कोणाची? बँक फक्त सुविधा देते, पण ती निष्काळजी राहिली आणि त्यामुळे चोरी, फसवणूक किंवा दरोडा घडला, तर ती पूर्ण जबाबदार धरली जाते. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार अशा प्रकरणात ग्राहकाला नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, ही भरपाई लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट मर्यादेपर्यंतच मर्यादित असते. म्हणजे, जर एखाद्याचं लॉकर भाडं 5,000 रुपये असेल, तर जास्तीत जास्त 5 लाख रुपये भरपाई मिळू शकते, जरी लॉकरातील वस्तू यापेक्षा अधिक किमतीच्या असल्या तरीही. म्हणूनच, आपल्या वस्तूंचा स्वतंत्र विमा काढणे केव्हाही चांगलं.
नैसर्गिक आपत्ती आल्यास मात्र…
पण जर नुकसान भूकंप, पूर किंवा अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे झालं, तर बँक जबाबदार धरली जात नाही. कारण अशा संकटांवर बँकेचं नियंत्रण नसतं. या प्रकरणात देखील बँक निष्काळजी होती हे स्पष्ट झाल्याशिवाय भरपाई मिळू शकत नाही.
म्हणूनच, ज्यांनी बँक लॉकर घेतलाय त्यांनी नियमितपणे लॉकर तपासावा, त्यात काय ठेवले आहे याची सविस्तर यादी स्वतःकडे ठेवावी. वस्तूंची किमती लक्षात घेऊन त्यांचा विमा काढणं गरजेचं आहे.