भारतासारख्या संस्कृतीप्रधान देशात माणसांची वाणी ही त्यांच्या स्वभावाचं आणि कधी कधी त्यांच्या संस्कारांचंही प्रतिबिंब असते. पण अलीकडच्या काळात हे चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. आपण ज्या प्रकारे बोलतो, त्यात सौजन्य, सुसंस्कार कमी होत चाललेत आणि त्यांच्या जागी गैरवर्तनाचे शब्द झिरपत आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही सवय आता फक्त पुरुषांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर महिलाही यामध्ये मागे राहिलेल्या नाहीत. एका अलीकडील सर्वेक्षणातून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
70,000 नागरिकांवर सर्वेक्षण
‘सेल्फी विथ डॉटर’ या सामाजिक उपक्रमाने मागील 11 वर्षांत एक व्यापक सर्वेक्षण केलं आणि जवळपास 70,000 नागरिकांचा अभ्यास केला. यात तरुण, शिक्षक, आई-वडील, प्राध्यापक आणि पंचायत सदस्य यांचा समावेश होता. या सर्वेक्षणातून असा निष्कर्ष काढण्यात आला की, देशातील अनेक भागांमध्ये शिवीगाळ आणि असभ्य भाषा वापरणं हे सामान्यपणे पाहायला मिळतं. संभाषणात गैरवर्तन करणं काही लोकांसाठी इतकं सहज आणि अंगवळणी पडलंय की ते कधी आणि कुणासमोर काय बोलतात याचंही भान राहत नाही.
दिल्ली शहर आघाडीवर
दिल्ली हे शहर या बाबतीत आघाडीवर असल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झालं. येथे जवळपास 80% नागरिक संवादात काही ना काही स्वरूपाचं गैरवर्तन करतात. त्याच्यानंतर पंजाबचा क्रमांक लागतो, जिथे 78% लोकांची हीच सवय आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार हे अनुक्रमे 74% सह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत, तर राजस्थानमध्येही 68% लोक गैरवर्तन करतात.
या अभ्यासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला तो म्हणजे महिलांचे गैरवर्तन करण्याचे प्रमाण. समाजात आपण अनेकदा हे गृहित धरतो की महिलांची भाषा सौम्य आणि संयमित असते, पण या सर्वेक्षणात 30% महिला आणि मुलींनीही गैरवर्तन केल्याचं स्पष्ट झालं. विशेषतः शाळा-महाविद्यालयांमध्ये तरुणींमध्येही अशा प्रकारची भाषा वापरण्याची प्रवृत्ती वेगाने वाढतेय, जे चिंतेचं कारण आहे.